जम्मू-काश्मीरमध्ये दोन वर्षांत १६८ दहशतवादी ठार

नवी दिल्ली, दि.२३ – भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये मागील दोन वर्षांत १६८ दहशतवाद्यांना ठार केले, अशी माहिती संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांनी लोकसभेत दिली. नियंत्रण रेषेलगत (एलओसी) आणि राज्यात इतरत्र ठार झालेल्या दहशतवाद्यांबाबतची आकडेवारी अँटोनी यांनी सभागृहाला लेखी उत्तराद्वारे पुरवली.

एलओसीलगत रिकामे असलेले टेहळणी नाके बळकावण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून केला जात असल्याचे वृत्त आहे. त्याबाबत स्पष्टीकरण देताना अँटोनी यांनी नमूद केले की, सीमेपलीकडून घुसखोरी करून नुकसान पोहोचवण्याचे प्रयत्न दहशतवाद्यांकडून चालूच आहेत. मात्र, दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळण्यासाठी सर्वतोपरी सज्जता ठेवण्यात आली आहे. हेलिकॉप्टरद्वारे गस्तही घालण्यात येत आहे.