चीनमध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लूचे थैमान

बीजिंग, दि.२३- चीनमध्ये बर्ड फ्लूने अगदी प्रचंड थैमान घालण्यास सुरुवात केली असल्याने संपूर्ण जगामध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. काही दिवसांपासून चीनमध्ये बर्ड फ्लूच्या संशियत रोग्यांची संख्या वाढून ८७ इतकी झाली आहे.

एच 7, एन 9 विषाणूंच्या संक्रमणामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूचे प्रमाण वाढत असून ५ नवीन रोगी सापडले आहेत. पाच पैकी शांघाय, जिंगसू आणि हेनान प्रांतातून प्रत्येकी एक तर जेजियांग प्रांतातून दोन रोगी आढळले आहेत, असे चीनच्या सरकारी वृत्तसंस्थाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब नियोजन कमिशनने या विषयी अधिक माहिती जाहीर केली आहे. सहा जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. तर ६४ रुग्णांवर उपचार सुरू आहे.