गेलची वादळी खेळी; पुणे वॉरियर्सचा धुव्वा

बंगलोर: आक्रमक फलंदाजी करताना ख्रिस गेलने पुणे वॉरियर्सच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवत केवळ ३० चेंडूत आठ चौकार आणि ११ षटकार ठोकून क्रिकेटच्या इतिहासातल्या वेगवान शतकाची नोंद केली. गेलच्या या शतकामुळेच बंगलोरने पुणे वॉरियर्सचा १३० धावांनी अगदी सहज पराभव केला. आयपीएलच्या मैदानात आजवर सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मान युसूफ पठाणच्या नावावर होता. त्याने ३७ चेंडूंत शतक फटकावले होते. गेलने ६६ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि १७ षटकारांसह नाबाद १७५ धावा करीत अनेक नवे विक्रम प्रस्थपित केले.

चिन्नास्वामी स्टेडियमवर गेलने पुणे वॉरियर्सच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला आणि तीस चेंडूंत आठ चौकार आणि ११ षटकार ठोकून शतकाची वेस ओलांडली. बंगलोरच्या डावाची निर्धारीत २० षटके संपली, तोपर्यंत गेलने ६६ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि १७ षटकारांसह नाबाद १७५ धावा केल्या होत्या. कोणत्याही ट्वेण्टी२० सामन्यातली ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. याआधी न्यूझीलंडच्या ब्रेण्डन म्रॅक्युलमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२५ धावांची तर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी नाबाद १५८ धावांची खेळी केली होती.

त्याशिवाय गेलचे हे शतक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठरले. याआधी ऑस्ट्रेलियाच्या अँड्र्यू सायमंड्सने कौंटी क्रिकेटमध्ये केंटकडून खेळताना ३४ चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. तर आंतरराष्ट्रीय ट्वेण्टी२०त सर्वात वेगवान शतकाचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या रिचर्ड लेवीच्या नावावर जमा आहे. लेवीने ४५ चेंडूंत शतक ठोकले होते. वन डेच्या मैदानात पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीने अवघ्या ३७ चेंडूंमध्ये शतक साजरे केले होते. तर विंडीजच्या विव्ह रिचर्डस यांनी इंग्लंडविरुद्ध ५६ चेंडूंमध्ये ठोकलेले शतक हे कसोटीतलं सर्वात वेगवान शतक आहे.

बंगळुरुच्या मैदानात गेलच्या या आतषबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेन्जर्सनी २० षटकांत पाच बाद २६३ धावांचा डोंगर उभा केला. गेलने अखेरच्या षटकात दोन विकेट्स घेत बंगलोरच्या सेलिब्रेशनमध्ये आणखी सहभाग नोंदविला.उत्तरादाखल पुणे वॉरियर्सना वीस षटकांत ९ बाद १३३ धावाच करता आल्या.

Leave a Comment