पावलांतील अंतर सांगेल चालण्याचा अचूक वेग

कोणाच्याही चालण्याचा अथवा पळण्याचा अचूक वेग संबंधित माणसाच्या पावलातील अंतरावरून अचूक सांगता येईल असे समीकरण दोन स्पॅनिश संशोधकांनी तयार केले आहे. मात्र त्यासाठी संबंधिताने समुद्र किनार्यायवरच चालणे अथवा पळणे आवश्यक आहे. प्रोफेशनल धावपटू आणि चालणार्‍या स्पर्धकांची गती मोजण्यासाठी आजपर्यंत त्यांच्या पायाची लांबी मोजावी लागत असे. मात्र नवीन समीकरणाने त्याची गरज भासणार नाही असे या संशोधकांचे म्हणणे आहे.

यासाठी या संशोधकांनी केवळ कुतुहलातून  २००८ साली १४ विद्यार्थ्यांना समुद्र किनार्‍यावर चालण्याची, पळण्याची विनंती केली होती आणि त्यातून गोळा झालेल्या निरीक्षणातून निघालेले निष्कर्ष २०१३ सालात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यातून असे दिसून आले की पायाची लांबी न मोजताही केवळ पळताना येणार्‍या पावलातील अंतरावरूनही वेग अचूक सांगता येतो. पूर्वी फॉसिल्सच्या ठशांवरून असा अंदाज बांधण्याचे समीकरण मांडले गेले होते. त्याचाच वापर येथे केला गेला आहे. एका ब्रिटीश संशोधकानेही याच समीकरणाचा वापर करून धावपटूंचा वेग मोजण्यात यश मिळविले होते.