विसावे शतक 1400 वर्षांत सर्वात उष्ण

मेलबर्न, दि. 22 – गेल्या 1400 वर्षांत सर्वाधिक तापमानाची नोंद ही विसाच्या शतकात झाली आहे. त्यामुळे विसावे शतक हे आजवरचे सर्वात उष्ण शतक ठरल्याचे एका वैज्ञानिक अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. सन 1971 ते 2000 या वर्षांत नोंदले गेलेले सरासरी तापमान हे याचे निदर्शक आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

गेल्या 2000 वर्षांतील तापमानाच्या नोंदींचा येथील एका अभ्यासगटाने धांडोळा घेतला असता विसाव्या शतकातील तापमानवाढीचा पृथ्वीवर झालेला परिणाम शोधला आहे. नेचर जिओसायन्स नामक वैज्ञानिक नियकालिकात याविषयीचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

मध्ययुगीन उष्ण कालखंड आणि लिटील आईस एज अर्थात अल्पावधीचा शीतकालखांड याचा विचार करता, तापमानात झालेला हा बदल मानवजातीसह पृथ्वीवरील सर्व स्जिवांच्यादृष्टीने हानीकारक असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

ही तापमानवाढ म्हणजे पृथ्वीवर अचानक आलेली आपत्ती असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे. किमान एक सहस्त्रकाचा कालखंड बर्‍यापैकी थंड गेल्यानंतर, सत्तरच्या दशकात तापमानवाढीला सुरुवात झाली. त्यानंतरच पृथ्वीवर त्सुनामीसारख्या आणि विनाशकारी भूकंपांसारख्या नैसर्गिक आपत्तींना निमंत्रण मिळाले. एवढेच नव्हे, तर वाढत्या तापमानामुळे विविध प्रकारच्या प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातीही नामशेष होण्यास सुरुवात झाली.

अर्थातच, यासाठीच्या कारणांचा शोध घेतला असता, या संशोधकांना असे आढळले की, सत्तरच्या दशकानंतर जगभरच लोकसंख्येचा विस्फोट झाला. काही देशांचा अपवाद वगळता, सर्वत्र शहरांची संख्या वाढली. कृषी क्षेत्र कमी झाल्याने गावाकडचा शेतकरीही शहराकडे स्थलांतरित झाला. त्यामुळे पर्यायाने काँक्रिटीकरण वाढले आणि वनक्षेत्रही घटले.

याशिवाय गेल्या सहाशे वर्षांत पृथ्वीच्या परिवलनात निर्माण झालेली अनियमितता आणि ग्रीन हाऊसचे वाढते प्रमाण यामुळे असह्य उकाडा निर्माण झाला आहे. यावर मात करायची असेल तर वृक्षांचे महत्त्व जाणणे महत्वाचे आहे. शिवाय माणसाने बदललेली जीवनशैली आणि त्यामुळे नैसर्गिक यंत्रणेवर येत असलेला ताण हाही एक महत्त्वाचा विषय असल्याचे दिसून आले आहे.

न्यू साऊथ वेल्सच्या एआरसी सेंटर फॉर एक्सलन्स फॉर क्लायमेट सिस्टीम सायन्स या संस्थेने हे संशोधन केले आहे. जॉन पिटर यांच्या नेतृत्वाखालील वीस जणांनी या संशोधनात भाग घेतला.

Leave a Comment