हिग्ज-बोसॉन कणाचे नाव बदलणार

लंडन, दि. 22 – हिग्जबोसॉन या गॉड पार्टिकलचे नाव बदलण्याचा विचार सुरु झाला असून गॉड पार्टिकलच्या संशोधनातील सर्व अग्रेसर संशोधकांमध्ये याबाबत एकमत होताना दिसत आहे. मात्र, हे नाव का बदलायचे याचे कोणतेही कारण संबंधितांना देता आलेले नाही, हे विशेष.
वास्तविक या संशोधनात संशोधक पीटर हिग्ज यांचा मोठा वाटा आहे. हिग्ज व बोस यांच्या संयोगातून हिग्जबोसॉन हा शब्द तयार झाला आहे. बंगाली भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांनी 1920 च्या दरम्यान अणुच्या क्षेत्रातील मूलभूत संशोधनात दिलेल्या योगदानामुळे त्यांचे नाव त्यात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गॉड पार्टीकलला त्यांचे नाव देण्यात आले होते. आता नवे नाव कोणते द्यावे त्याबाबतही विचारविनिमय सुरु आहे.

ब्राऊट-एंग्लर्ट-हिग्ज किंवा बीईएच पार्टिकल अशी ही नवी संकल्पना आहे. त्यात बेल्जियम भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्राऊट आणि फ्रँकोइस एंग्लर्ट यांची नावे समाविष्ट आहेत. बीईएचजीएचके पार्टिकल असे दुसरे नाव आहे. त्यात गिराल्ड गरलनिक, कार्ल हेगन, टॉम किबल यांच्या नावांची प्रातिनिधिक अक्षरे आहेत.

गॉड पार्टिकलचे नाव बदलण्याच्या चर्चेने भौतिक क्षेत्राशी संबंधित समुदायात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात युरोपीय अणुसंशोधन संघटनेच्या परिषदेत अनेक वक्त्यांनी हिग्जबोसॉनचा उल्लेख टाळला. त्याऐवजी ‘बीईएच’ असे संबोधण्याचे आवाहन करण्यात आले होते.