काबूल दि.२२ – अफगाणिस्तानच्या पूर्व भागातीतल लोगार विभागात तातडीने उतरविल्या गेलेल्या तुर्की हेलिकॉप्टरमधील आठ जणांचे तालिबान्यांनी अपहरण केले असल्याचे वृत्त आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर पायलटला तातडीने वरील भागात उतरवावे लागले होते. हा भाग पाकिस्तान सीमेलगत असून येथे तालिबान्यांचे वर्चस्व आहे.
अफगाणिस्तानचे लोगोर विभागाचे पोलिस उपायुक्त रैस खान सादिक यांनी दिलेल्या माहितीनुसार तुर्कस्तानच्या खोरासन कार्गो कंपनीचे हे हेलिकॉप्टर आहे. तुर्कस्तानचा खोश्त येथे मोठा प्रकल्प असून त्या प्रकल्पावर काम करणारे सात अभियंते आणि दोन परदेशी व एक अफगाणी पायलय या हेलिकॉप्टरमधून जात होते. विमान उतरवावे लागल्यावर सुरक्षा रक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मात्र हेलिकॉप्टर सापडले पण आतील प्रवासी गायब होते. त्यांचे तालिबान्यांनी अपहरण केले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे हेलिकॉप्टर काबूलच्या दिशेने जात होते.