संत्याभाई म्हणजेच संतोष जुवेकरची मराठी रसिकांना आगळी-वेगळी पण चांगली
ओळख आहे. तसेच हेमांगी कवीचीही. हेमांगी ने छोट्या पडद्यावर आपल्यातील
विनोदी कलाकारही प्रदर्शित केली आहे. पण, आता हे दोघेही एका अनोख्याच
अवतारातून रसिकांपुढे येणार आहे.
संत्या आणि हेमांगीचा अनोखा अवतार
आज जरी मराठी चित्रपटांचे व्यावसायिक समीकरण बदलत असले तरी काही निर्मिती
संस्था, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते वैविध्यपूर्ण आणि आशयघन सिनेमाच्या
निर्मितीत सक्रिय आहेत. अंकित मगरे आणि विजय बारसे यांच्या आर. जे.
प्रॉडक्शनस प्रा.लि. यांनी पहिलीच निर्मिती वास्तववादी सिनेमाची ठरवून
गडद जांभळ या सिनेमाची निर्मिती केली आहे.
गडद जांभळ सिनेमा म्हणजे आदिवासींचे भावविश्व ज्याप्रकारे दिवसातील
दोन्ही प्रहरांच्या वेळी आकाशाचा रंग हलकासा जांभळा होतो त्याच प्रहरात
आदिवासी जमात पोटासाठी जगात असते म्हणून सिनेमाचे शीर्षक ’गडद जांभळ’
असल्याचे लेखक दिग्दर्शक संदीप नवरे यांनी सांगितले. सिनेमा जरी
प्रेमकथेच्या अंगाने जात असला तरी परंपरेने चालत असलेले सत्तेचे राजकारण
झुगारण्याचा नायकाचा संघर्ष इथे महत्वाचा ठरतो. आपण आज म्हणतो की
स्त्रियांना स्वातंत्र्य मिळायला हवे , परंतु आदिवासी समाजात अनेक
वर्षांपासून स्त्रियांना स्वातंत्र्य आहे. त्यांच्यात विधवेला वाईट
नजरेने पहिले जात नाही, आजही विधवेची लग्न होताना दिसतात इतकेच नव्हे तर
विधवेच्या लग्नाचा सर्व विधी हा विधवेच्या हातूनच केला जातो. अशा अनेक
गोष्टी आहेत ज्यामध्ये आदिवासी समाज हा आज आपल्यापेक्षा पुढारलेला दिसतो.
या सिनेमाची अजून एक खास बात म्हणजे सिनेमाची भाषा ही मराठी आणि कातकरी
आहे. तसेच या सिनेमाचे चित्रीकरण हे पूर्णत: रिअल लोकेशन्सवर करण्यात आले
आहे. या सिनेमात संतोष जुवेकर, हेमांगी कवी, सयाजी शिंदे , मिलिंद शिंदे,
कविता मगरे, रसिक धामणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचे लेखन
आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे.
