पुणे, दि. 21 (प्रतिनिधी) – मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार अभिनयाचे कुलगुरु असलेले राजाभाऊ परांजपे फक्त राजा माणूस नव्हते तर ते देवमाणूस होते. राजाभाऊ केवळ अभिनयाचे प्रशिक्षण देत नसत तर त्यांच्या सानिध्यात आलेल्या लोकांना ते जगण्याची नवी दिशा देत असत असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी रविवारी काढले.
स्नेहल प्रकाशनच्या वतीने अनिल वळेल लिखीत राजा माणुस या पुस्तकाचे प्रकाशन देव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ दिग्दार्शक राज दत्त होते. प्रतिभा शाहु मोडक, प्रकाशक रविंद्र घाटपांडे उपस्थित होते.
देव म्हणाले, राजभाऊंच्या कामाचे कौतुक झाले प्रसिद्धी मिळाली मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही याची खंत वाटते. प्रेक्षकांच्या टाळ्या हेच त्यांचे दैवत होते. राजाभाऊंची भेट झाली नसती तर मी अभिनेता झालो नसतो असे सांगतांना त्यांनी सिमाताई आणि त्यांच्या जुळलेल्या ऋणानुबंधाच्या आठवणींना उजाळा दिला.
राज दत्त म्हणाले, राजाभाऊ खरोखरच राजा माणूस होते. त्यांनी कलावंत घडविण्या बरोबरच संगीताचे सौंदर्य वाढविण्याचे आणि कथेला नवे आयाम देण्याचे काम केले आहे. कुंभार ज्या प्रमाणे मातिला आकार देतो तश्या प्रकारे त्यांनी आपल्या कलाकृती घडविल्या. या पुस्तकाच्या मध्यमातुन राजाभाऊंचे साधे, सरळ उत्कट आयुष्य नव्या पिढी समोर आले आहे त्यामुळे हे पुस्तक नव्या पिढीला दिशा देणारे मार्गदर्शक ठरेल हे निश्चित. यावेळी लेखक अनिल वळेल आणि प्रतिभा शाहु मोडक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रामाचे प्रस्ताविक रविंद्र घाटपांडे यांनी केले.
फोटो ओळ – लोकमान्य सभागृह, ज्येष्ठ दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांच्यावरील ‘राजा’माणुस या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी (डावीकडुन) प्रतिभा शाहू मोडक, राज दत्त, अनिल वळेल, रविंद घाटपांडे.