रवीची दमदार कामगिरी

कोलकाता- गेल्या काही सामन्यात रवींद्र जडेजाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. आयपीएल मध्ये रवींद्र जाडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने निसटत जात असलेला विजय खेचून आणला. एकंदरीत रवींद्र जाडेजाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या संघाने शनिवारी संध्याकाळी ईडन गार्डन्सवर झालेल्या आयपीएलमधील लढतीत यजमान कोलकाता नाइट रायडर्सवर ४ गडी व ५चेंडू राखून विजय मिळवला. हा त्यांचा स्पर्धेतील चौथा विजय ठरला. दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सला चौथा पराभव आहे. कोलकाता नाइट रायडर्सच्या १२० या माफक धावसंख्येचा पाठलाग करणार्‍या चेन्नई सुपरकिंग्जची सुरुवात सावध झाली. रविचंद्रन अश्‍विनला मायकेल हस्सीच्या साथीने सलामीला पाठवण्यात आले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी २४ धावांची भागी केली. पण लक्ष्मीपती बालाजी, सचित्रा सीनानायके, सुनील नरीन व युसूफ पठाण यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर यजमानांना झोकात पुनरागमन करता आले.

मुरली विजय, सुरेश रैना, धोनी आणि एस बद्रीनाथ यांना दुहेरी आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. एका बाजूने फलंदाज बाद होत असताना दुसर्‍या बाजूने मात्र हस्सीने किल्ला लढवला. पण १७व्या षटकात बालाजीने हस्सीला ४० धावांवर तंबूचा रस्ता दाखवला आणि सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी दिली. यानंतर जाडेजाने (नाबाद ३६) ड्वेन ब्राव्होच्या साथीने खेळपट्टीवर उभे राहून चेन्नई सुपरकिंग्जला विजय मिळवून दिला.

Leave a Comment