पुणे, दि. 21 (प्रतिनिधी) – मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या देशातील इतर प्रादेशिक भाषेच्या तुलनेत सर्वाधिक चांगले विषय येत आहेत. तरूण दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्या वेगळे काही करण्याच्या वृत्तीने मराठी चित्रपटसृष्टी यशाच्या शिखरावर आहे. मराठीचा हा सुवर्णकाळ आहे असे मत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी व्यक्त केले.
मराठी चित्रपटांचा सध्या सुवर्णकाळ – गोविंद निहलानी
राजा परांजपे प्रतिष्ठानच्या वतीने चौथा ‘राजा परांजपे सन्मान महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते निहलानी यांना प्रदान करण्यात आला यावेळी योगेश देशपांडे यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना राणे, अजय राणे आदी यावेळी उपस्थित होते.
निहलानी म्हणाले, मझ्या कारकिर्दीची सुरूवात शांतता कोर्ट चालू आहे चित्रपटाच्या माध्यमातुन निर्माता व सिनेमेटोग्रामर म्हणुन झाली आहे. चित्रपट सामाजिक परिस्थितीनुसार सातत्याने बदलत जाणारे माध्यम आहे. समांतर चित्रपट करतांना आम्ही सामाजिक आशय असलेले चित्रपट विचारपूर्वक द्यायचो आजच्या काळात सर्व विषयाकडे मनोरंजानाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. अर्धसत्य, देव मध्ये मी मांडलेला पोलिस अधिकारी वेगळा होता नंतरच्या काळात पोलिसांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टष्टीकोन बदलला त्याचेच द्योतक चुलबुल पांडे आहे.
दूरदर्शनवर गाजलेल्या तमस या मालिकेविषयी बोलताना निहलानी म्हणाले, माझ्या कुटुंबाने माळणी नंतर कराचीहुन भारतात स्थलांतर केले होते यामुळे त्यावेळेस कोणत्या संकटांना सामोरे जावे लागले याची पूर्ण जाणीव मला होती. या विषयावर चित्रपट करण्याची माझी इच्छा होती मात्र मालिके नंतर तशी संधी मिळाली नाही. राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी धर्माचा, जातीचा कसा वापर करून घेतात हे सांगणारी ही उत्तम कथा होती. स्वातंत्र्यानंतर लोकांच्या काही अपेक्षा होत्या स्वातंत्र्यानंतरच्या 20 वर्षात त्यातील कोणत्याही अपेक्षा पुर्ण झालेल्या नव्हत्या त्या पार्श्वभूमीवर ती कथा होती त्याला स्वःतच्या अनुभवाची जोड दिल्याने वास्तविकता मांडता आली. महापौर वैशाली बनकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
