‘दहशतवादी व्हा’ जोशी सरांचा सल्ला

रायगड – शिवसेनेच्या माणगावमध्ये झालेल्या सभेत ज्येष्ठ नेते मनोहर जोशी कमालीचे आक्रमक होते. त्यांनी दहशतवादाचा मुकाबला गांधीगिरीने शक्य नाही, तर दहशतवादानेच व्हायला हवा, असे खळबळजनक विधान केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत त्यांच्या पेक्षा सरांचेच भाषण चर्चेचा विषय ठरले आहे.

तसे पहिले तर गेल्या काही दिवसपासून मनोहर जोशी नेहमीच काही ना काही कारणाने प्रकाशझोतात राहत असतात.माणगावमध्ये झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत आधी मनोहर जोशी यांचे भाषण झाले. सरांनी नेहमीपेक्षा आक्रमक होत यावेळी जमलेल्या गर्दीला भडकवण्याच प्रयत्न केला. अतिरेक्यांचा नंगानाच, दुष्काळाचे बळी, महागाईचा भस्मासुर यामुळे जनता बेहाल झाली आहे. या काँग्रेसच्या दिशाहीन नाकर्त्या सरकारचा कायमचा बंदोबस्त करावाच लागेल, असे सांगताना दहशतवादाचा मुकाबला करण्यात काँग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता दहशतवादाचा मुकाबला गांधीगिरीने नाही, तर दहशतवादानेच करावा लागेल’, असे उद्गार त्यांनी काढले. जनतेसाठी कायदा हातात घ्यावा लागला तरी बेहत्तर, असा इशाराही त्यांनी दिला. ‘

दुष्काळ, अजित पवार, सुनील तटकरे, आर. आर पाटील, ओवेसी बंधू असे नेहमीचे विषय घेऊन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण केले. मात्र या सभेनंतर त्यांच्यापेक्षा मनोहर जोशी यांच्या भाषणाचीच चर्चा जास्त होती.