दिल्ली पुन्हा अस्वस्थत; सर्वत्र निदर्शने

नवी दिल्ली-डिसेंबर महिन्यात एका युवतीवर झालेल्या बलात्कारच्या घटनेच्या जखमा पाच वर्षांच्या मुलीवरील अमानुष बलात्काराने पुन्हा भळभळू लागल्या असून, त्यामुळे राजधानी नवी दिल्लीतील वातावरणात पुन्हा एकदा अस्वस्थता पसरली आहे. नृशंस कृत्य करणारा मनोज कुमार या ( २२ ) नराधमाला शुक्रवारी पहाटे बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील चिकनौटा येथील त्याच्या सासरहून अटक करण्यात आली .

राजधानी नवी दिल्लीच्या गांधीनगर भागात राहणाऱ्या या पाचवर्षीय मुलीवर हा अतिप्रसंग कोसळला तो तिच्याच शेजारी राहणाऱ्या मनोजकुमार या २२ वर्षीय विवाहित तरुणामुळे . या तरुणाने या लहानगीला पळवून चार दिवस आपल्या घरात कोंडून ठेवले व तिच्यावर पाशवी बलात्कार केला . ही घटना शुक्रवारी उघड झाल्यानंतर सर्वत्र तीव्र पडसाद उमटू लागले .

शनिवारी सकाळीच ‘ एम्स ‘ हॉस्पिटल आणि दिल्ली पोलिस मुख्यालयांवर निदर्शकांनी धडक मारली . बलात्कारी तरुणास तातडीने फासावर लटकवा , महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक कायद्याची तातडीने अमलबजावणी करा , बलात्काराची शिकार झालेल्या लहानगीच्या वडिलांना लाच देऊ करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा अशा मागण्यांनी निदर्शकांनी परिसर दणाणून सोडला होता . पोलिस मुख्यालयात घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला ; मात्र पोलिसांनी तो कसाबसा रोखला . या दरम्यान पोलिस व निदर्शक यांच्यात झटापटही झाली .

दिल्ली पोलिसांचे मुख्यालय , लहानगीवर उपचार सुरू असलेले ‘ एम्स ‘ हॉस्पिटल यांसह केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे , काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या बंगल्यांबाहेर घोषणाबाजी करत त्यांनी संतापाला वाट करून दिली . त्यांची भावना एकच होती , बस्स झाले … आता न्याय हवा ! या लहानगीच्या प्रकृतीत सुधारणा असून ती उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे व तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले .