नाशिक- नाशिक महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने मनसे उमेदवार रमेश धोंडगे यांना मदत केली केली. त्यामुळे धोंडगे यांच्या विजयात शिवसेनेने मोलाची भूमिका बजावली. या निमित्ताने नाशिकमध्ये मनसे-भाजप-शिवसेना या ‘विशालयुती’चे चित्र पाहायला मिळाले आहे. ही ‘महायुती’ म्हणजे ‘विशालयुती’ची नांदी असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
काही दिवसापूर्वी नाशिक महानगरपालिकेत मनसेला सत्तास्थापनेसाठी भाजपने मदत केली होती. महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेची साथ सोडून मनसेला मतदान केले होते , तर सेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत घरोबा केला होता. परंतु आता या महाआघाडीपासून फारकत घेण्याची त्यांची इच्छा आहे. स्थायी समिती सभापतीपदासाठीही शिवसेनेनं मनसे-भाजप युतीला मदत केली आहे. शनिवारी झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे मत मनसेच्या रमेश धोंडगे यांना मिळाले आणि १० विरुद्ध ६ मतांनी त्यांनी बाजी मारली.
नाशिक येथील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसेसोबत राहण्याचे आदेश खुद्द शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच दोन दिवसांपूर्वी दिले होते. मनसे-भाजप युतीच्या बाजूने कौल देऊन त्यांनी नव्या ‘नाशिक पॅटर्न’चे संकेत दिले होते. हे मत म्हणजे उद्धवदादूनं पुन्हा राजला घातलेली साद मानली जातेय.