सिचुआन दि.२० – आज म्हणजे शनिवारी सकाळी आठच्या सुमारास चीनच्या दक्षिण पश्चिम भागातील सिचुआन प्रांतात झालेल्या जोरदार भूकंपात किमान ७२ जण ठार तर ७०० जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. सात रिश्टर स्केल अशी भूकंपाची तीव्रता मापली गेली असून त्याचे केंद्र जमिनीत १३ किमी खोल होते असे सांगण्यात येत आहे. या भूकंपात इमारतींचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. लष्कराच्या तुकड्या या भागात दाखल झाल्या असून इमारतींखाली अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे तसेच जखमींना रूग्णालयात हलविण्याचे काम सुरू झाले आहे.
चीनमध्ये जोरदार भूकंप- ७२ ठार, ७०० जखमी
चीनच्या सीसीटिव्ही या सरकारी दूरवाहिनीतील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींचा आकडा १ हजाराच्या वर आहे. २००८ साली या प्रांतात ८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता तेव्हा ९० हजार लोक त्यात मृत्युमुखी पडले होते असेही सांगितले जात आहे. तिबेट जवळ असलेला हा भाग भूकंपप्रणव क्षेत्र समजला जातो. गेल्या पाच वर्षात या प्रदेशाला दुसरा प्रचंड भूकंप झाला आहे. या प्रांताची राजधानी चेंगडू येथेही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत आणि येथील विमानतळाचे नुकसान झाल्याने विमानतळ बंद केला गेला आहे असे समजते.
