नवी दिल्ली – गेल्या काही दिवसापासून नरेंद्र मोदींच्या मुद्द्यावरून जनता दल ( युनायटेड ) भाजपशी काडीमोड घेण्याच्या उंबरठ्यावर आहे. याचा फायदा आता केंद्रातील युपीए सरकार करीत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने ही ‘ राजकीय खेळी ‘ केल्याचे बोलले जात आहे . त्यामुळेच केंद्राने बिहारसाठी १२००० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले .
बिहारने २०००० कोटी मागितले असताना बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या उर्वरित चार वर्षांसाठी बिहारला विशेष मदत म्हणून हे १२००० कोटी देण्यात आले आहेत . आर्थिक व्यवहारांविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला .
केंद्रातील युपीए सरकारवर जेडीयूचा मित्रपक्ष असलेल्या भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी नाराजी व्यक्त केली. बिहारने २०००० कोटी मागितले असताना केंद्राने फक्त १२००० कोटी देऊन राज्याची बोळवण केली असल्याचे ते म्हणाले . दरम्यान , हा कोणताही ‘ राजकीय निर्णय ‘ नसल्याचा दावा माहिती व प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांनी केला आहे. तरीपण काही राजकीय तंजाच्या मते काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने ही ‘ राजकीय खेळी ‘ केल्याचे बोलले जात आहे .