फाशी अमलात आणताना गुप्तता हवीच

नवी दिल्ली दि.१९ – फाशीची शिक्षा झालेल्यांचा दयेचा अर्जही फेटाळला गेला असेल तर ही शिक्षा अमलात आणताना गुप्तता पाळायलाच हवी असे विधान केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा नव्या वादविवादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रपतींनी फाशीची शिक्षा झालेल्याचा दयेचा अर्ज फेटाळला असेल तर त्याला राष्ट्रपतींच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी अनेक समाजतज्ञांकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचे हे विधान आले आहे.

एका पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे वरील विधान करतानाच राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर १० जणांनी न्यायालयात धाव घेतल्याचे सांगून म्हणाले की फाशीची शिक्षा झालेल्याच्या कुटुंबियांना माहिती द्यावी मात्र फाशीची शिक्षा गुप्तपणेच अमलात आणली जावी असे आपले मत आहे. अफजल गुरूच्या फाशीच्या वेळी मात्र त्याच्या कुटुंबियांशी कम्युनिकेशन गॅप राहिल्याचे त्यंनी अप्रत्यक्षपणे मान्यही केले. फाशीची शिक्षा कधी दिली जाणार हे आधीच जाहीर केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडे चार जणांनी या शिक्षेच्या अमलबजावणीवर स्टे आणला असल्याचे उदाहरणही त्यांनी यावेळी दिले.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राजीव गांधी हत्या प्रकरणातील तीन जणांचा दयेचा अर्ज फेटाळला होत्या त्या सर्वांनी म्हणजे मुरूगन, संथन आणि परारिवलन यांनी शिक्षेवर स्टे आणल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ९ जणांचे दयेचे अर्ज फेटाळले आहेत.

Leave a Comment