दार्जिलिंग – चिमुकल्या रेल्वेची सफर

darjeeling

पश्चिम बंगालमध्ये असलेले लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणजे दार्जिलिंग. युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट केलेली हिमालयातली पहिली चिमुकली रेल्वे हे इथले मोठे आकर्षण. राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या भूमिका असलेला आराधना आठवतोय ? त्यात सुरवातीलाच मेरे सपनोंकी रानी कब आएगी तू हे गाणं म्हणताना राजेश खन्ना जीपमधून आणि रस्त्याच्या कडेकडेनेच जाणार्‍या या छोट्या रेल्वेतून जाणारी शर्मिला आठवा. ती हीच रेल्वे.खरंतर झुकझुक गाडी हेच नांव अधिक शोभेल अशी. 1881 सालात ही छोटी गाडी सुरू झाली आणि आजही ती तशीच धावते आहे.

Darjeeling1

(फोटो सौजन्य – Trawell.in)

ब्रिटीश जेव्हा कलकत्त्यातून भारताचा कारभार हाकत होते तेव्हा त्यांची उन्हाळी राजधानी होती दार्जिलिंग. डोगंररांगावर चौफेर पसरलेले चहाचे मळे, शहरातून घडणारे हिमालयातील कांचनगंगा शिखरांचे मनोहारी दर्शन, ट्रेकर्ससाठी अनेक ट्रेकिंग पॉईंटस, आकाशाची हातमिळवणी करणार्‍या साल ,ओक वृक्षांची घनदाट जंगले, तर्‍हतर्‍हेची आर्किडस, स्थलांतर करून येणारे चित्रविचित्र पक्षी आणि सतत कांही ना काही स्थनिक उत्सव ही या थंड हवेच्या ठिकाणाची कांही आकर्षणे.

Darjeeling2

(फोटो सौजन्य – goibibo.com)

सिलीगुडीहून बसने अथवा शेअर जीपने किंवा खासगी गाडीने दार्जिलिंगला जाता येते. छोट्या झूुकझुक गाडीतून जायचे असेल तर जलपायगुरीला उतरावे लागते आणि तेथून ही गाडी पकडायची. येथील हिमालयन माऊंटेनिरनिंग इन्स्टिट्यूट हे सर्वाधिक भेट दिले जाणारे ठिकाण.1953 साली एडमंड हिलरी बरोबरच एव्हरेस्ट सर करणारा तेनसिंग नॉरगेचा या संस्थेच्या उभारणीत महत्त्वाचा वाटा आहे.

Darjeeling3

दार्जिलिंगला साईट सीईंग करण्यासाठी अनेक जागा आहेत. हिमालयन झू, जपानी शांती स्तूप, बौद्ध मानेन्स्ट्री, रॉक गार्डन, ऑब्झरवेटरी हिल, मकाल बाबू कोठान अशी मोठी यादीच आहे. येथील जपानी स्तूप हा जगात जे 30 शांतीस्तूप जपान्यांनी उभे केले त्यातील एक आहे. टायगर हिलला जायचे ते सूर्योदय पाहायला. या भागात सूर्य लवकर उगवतो त्यामुळे शेअर जीप अथवा स्वत:च्या खासगी वाहनाने पहाटे तीन वाजताच निघावे लागते. सूर्याची कांचनगंगा शिखरांवर पडणारी पहिली किरणे ही शिखरे जणू सोन्याची बनवितात आणि पाहणार्‍यांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. ऑब्झरव्हेटरी हिल जवळच असलेले रॉक गार्डन, छोटा धबधबा आणि खडकांत फुललेली असंख्य जातीची फुले यासाठी पाहायची. येथेच स्थानिक ड्रेसमध्ये फोटो काढून घेता येतात.

Darjeeling4

दार्जिलिंगला जाऊन चहा खरेदी करायची नाही हे बरोबर नाही. त्यामुळे खास दार्जिलिंगचा चहा घेतानाच चौरसा येथे असलेली तिबेटियन हिमालयीन संस्कृती दाखविणारी पेंटिंग्ज, चाकवुलचे कपडे, चामडी वस्तू, लाकडी पुतळे, चपला, लाकडी बाऊल्स, दागिने यांनी खच्चून भरलेली दुकाने खरेदी करायची नसली तरी नुसती पाहायलाही हरकत नाही. खरेदी करून किंवा नुसते विंडो शॉपिंग करून दमायला झाले तर नेपाळी, उत्तर भारतीय, कॉन्टीनेन्टल अशा विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा. आपल्या उकडीच्या मोदकांसारखेच विविध स्टफिंग करून बनविलेले मोमो अवश्य खावेत असे.

या ठिकाणी कोणते ना कोणते स्थानिक उत्सव सतत सुरू असतात. संगीत,नृत्याची मेजवानी देणारे हे उत्सव मे ते जून, सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात सुरू असतात. धिरदम टेंपल हे रेल्वे स्टेशन जवळच असलेले शिवमंदिर वैशिष्ठपूर्ण आहे. पाच मुखी आणि त्रिनेत्री महादेव ही याची खासियत असून या प्रत्येक मुखावरचे भाव वेगवेगळे आहेत. तिबेटी पद्धतीचे याचे शिखरही लक्ष वेधून घेणारे.

या सुंदर पर्यटन स्थळाला 2008 पासून गोरखा लँड चळवळीमुळे धगधगते रूप आले आहे. सतत होणारे संप आणि कोणत्याही क्षणी उसळणारा हिंसाचार यामुळे येथे जाताना प्रथम परिस्थितीची माहिती करून मगच जावे हे उत्तम.

Leave a Comment