भारतात आजवर अनेक दहशतवादी कारवाया झाल्या पण त्यात गुंतलेले अस्तनीतले निखारे फार कमी वेळा सापडले. पाकिस्तानातले अतिरेकी भारतात येऊन अशा कारवाया करतात पण त्यांना स्थानिक मदत आणि मार्गदर्शन असल्याशिवाय हे शक्यच नाही. कोण करते ही मदत? २००१ सालच्या संसदेवरच्या हल्ल्यात अशी मदत अफझल गुरूने केली होती तर नंतरच्या अनेक हल्ल्यात तशी ती हिमायत बेगने केली. त्यानेच पुण्याच्या जर्मन बेकरीत बाँबस्फोट घडवून १७ जणांचे प्राण घेतले. त्या क्रूरकर्मा हिमायत बेग याला अखेर पुण्याच्या सत्र न्यायालयाने फाशीची सजा फर्मावली आहे.
दहशतवादी कारवाया करणारे अजूनही काही साप हाती लागले आहेत. त्यांनाही अशाच शिक्षा झाल्या पाहिजेत अशी जनतेची मागणी आहे. तसे झाल्याखेरीज ही प्रवृत्ती रोखली जाणार नाही. त्याला न्यायालयाने अनेक गंभीर कलमांखाली दोषी ठरवले होते आणि त्या कलमांत फाशीची शिक्षा व्हावी अशी काही कलमे होती. त्या शिवाय त्याला बनावट दस्तावेज तयार करणे, स्फोटके बाळगणे अशा इतरही काही गंभीर गुन्हयांत दोषी ठरवले गेले होते.
एवढे गुन्हे सिद्ध झाल्यास फाशीची शिक्षा अपेक्षितच होती.
मध्यंतरीचा एक काळ असा होता की, समाजात फाशीच्या शिक्षेबाबत प्रतिकूल मते व्यक्त केली जात होती. मुळात ही शिक्षाच कायद्यातून काढून टाकावी अशी सूचना अनेक लोक करायला लागले होते. पण गेल्या तीन चार महिन्यांत वातावरण बदलले. अनेक खटल्यांत फाशीची शिक्षा सुनावलीही गेली आणि बलात्कारासारख्या गुन्हयांना फाशीची शिक्षा सुनावली जावी अशी जाहीर मागणी करण्यात आली. काही कैद्यांनी आपली फाशीची शिक्षा रद्द व्हावी असे अर्ज न्यायालयात आणि राष्ट्रपतींकडे केले होते पण ते फेटाळण्यात आले. अशा या माहौलमध्ये दहशतवादी कारवायांत गुंतलेल्या अशा आरोपीला फाशीची शिक्षाच सुनावली जाणार हे गृहितच होते. तसे झाले नसते तरच नवल वाटले असते.
दहशतवादी कारवायांत मुळात आरोपीच हाती लागत नाहीत कारण अशा कारवायांचे नियोजन उत्तम केले जाते. गुप्तता पाळली जाते. या कारवायांत गुंतलेले लोक अगदीच अनपेक्षित असतात. नेहमीचे सराईत गुन्हेगार नसतात. पोलिसांनी नेमके कोणावर लक्ष ठेवावे असा प्रश्न असतो. आरोपी पकडले गेले की त्या अटकेला अनेक प्रकारचे रंग दिले जातात. आता हिमायत बेगला ज्या प्रकरणात शिक्षा झाली आहे त्या प्रकरणात इतरही ५ आरोपी आहेत पण त्यातला केवळ हिमायत बेग हा एकटाच सापडला. अशा दुर्मिळ आरोपीला कडक शिक्षा सुनावली गेली तरच बाकीचे त्या मार्गावर जाणारे आरोपी थोडा फेरविचार करतील.
हिमायत बेगला फाशीची शिक्षा सुनावली गेली तेव्हा तो रडला आणि त्याने आपण निर्दोष आहोत असा दावा केला. अर्थात तसा तो करणार हे साहजिक आहे पण न्यायालये कोणालाही दोषी ठरवताना पुराव्याची कसोशीने शहानिशा करीत असतात. तो निरपराध असता तर त्याला न्यायालयाने दोषी ठरवलेच नसते. या खटल्यात तर १०३ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. बेग जर निर्दोष आहे तर त्याला ते सिद्ध करण्याची संधी अनेकदा मिळालेली होती पण त्याला आपले निर्दोषित्व पुराव्याच्या आधारे सिद्ध करता आले नाही. शेवटी तो भावनिक आव आणून तसा दावा करीत आहे. मुळात पुण्यात जर्मन बेकरीत स्फोट झाला तेव्हा हिमायत बेग पुण्यात नव्हता तर तो मुंबईत होता असे दाखवण्याचा प्रयास त्याच्या वकिलाने केला होता पण तो व्यर्थ ठरला.
हिमायत बेग हा केवळ एक दहशतवादी नाही. तो इंडियन मुजाहेदीन या दहशतवादी संघटनेचे जाळे विस्तारित करण्यासाठी प्रयत्न करणारा म्होरक्या आहे.
तो कोणाच्या तरी आदेशाने काम करणारा साधा कार्यकर्ता नाही तर त्याने मराठवाड्यात काही तरुणांच्या भेटी घेऊन त्यांना धर्माच्या नावावर चिथावून इंडियन मुजाहदीन संघटनेत ओढण्याचा आणि त्यांच्या हातून हिंसक कारवाया घडवण्याचा प्रयत्न केला आहे. तो मुळात राहणारा बीडचा आहे. तो घरातून शिकायला जातो असे सांगून पळाला आणि आपण लातूर येथे राहतो असे आपल्याला पालकांना सांगत राहिला. प्रत्यक्षात तो लातूर जिल्हयातल्या उदगीरला होता. तिथल्या आय. टी. आय. मध्ये शिकत होता आणि तिथे नगरपालिकेचा गाळा घेऊन सायबर कॅफे चालवत होता.
हा गाळा घेऊन देताना तिथल्या माजी नगराध्यक्षाने त्याला मदत केली होती. ती कोणत्या हेतूने केली हे माहीत नाही पण काही वेळा या नगराध्यक्षाचा आणि त्याच्या मुलाचा जबाब घेण्यात आला आहे. हिमायत बेग हा आपल्या संघटनेच जाळे पसरवण्याचा प्रयत्न कसा करत होता याचे अनेक किस्से समोर आले आहेत. या स्फोटातले अन्य आरोपी फरार आहेत. त्यात कर्नाटकातल्या भटकळ बंधूंचा आणि त्याच आडनावाच्या तिसर्या् एका आरोपीचा समावेश आहे. हे आरोपी काही सामान्य नाहीत. ते अनेक स्फोटांच्या घटनांत सामील होते. त्यांना सध्या पाकिस्तानात दाऊद इब्राहीमची मदत आणि संरक्षण मिळत असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे वृत्त आहे. हेही आरोपी सापडायला हवे होते.