मोदींबाबत कुठलाही वाद नाही

बंगळूर, दि. 19 – पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे करण्यावरून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये अस्वस्थता असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि जेडीयू या मित्रपक्षांमध्ये बर्‍याचदा शाब्दिक युद्धही रंगले. मात्र, मोदींबाबत कुठलाही वाद नसल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

जेटली येथे पत्रकारांशी बोलत होते. मोदींवरून भाजप आणि जेडीयूमध्ये शाब्दिक युद्ध होत असल्याबाबतचा प्रश्‍न जेटली यांना विचारण्यात आला. त्यावर ते उत्तरले, या मुद्द्यावर कुठला वाद असल्याचे मला वाटत नाही. भाजपमधील लोकप्रिय नेत्यांपैकी मोदी एक आहेत. त्याबाबत आम्हाला अभिमानच आहे. एनडीएमध्ये आणखी पक्षांना आणण्यासाठी भाजप पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींच्या नावाचा त्याग करणार का, असेही जेटली यांना विचारण्यात आले. या प्रश्‍नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, त्याग करण्यात नव्हे तर प्राप्त करण्यात आम्हाला रस आहे.

मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले जाणार नाही, असे आश्‍वासन भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू नेते नितीशकुमार यांना दिले होते, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्याबाबत विचारल्यावर जेटली म्हणाले, प्रसारमाध्यमांमधील वृत्तावर आमच्या पक्षाकडून प्रतिक्रिया मिळणार नाही. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराविषयीचा निर्णय घेतल्यानंतरच आम्ही या मुद्द्यावर बोलवू. उमेदवार निश्‍चित झाल्यानंतर याबाबतचा निर्णय आम्ही प्रसारमाध्यमांना कळवूच, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. तिसर्‍या आघाडीच्या स्थापनेबाबतच्या चर्चेची त्यांनी यावेळी खिल्ली उडवली. तिसरी आघाडी ही अयशस्वी ठरलेली कल्पना असल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment