पवार, देशमुखांसह गडकरी मुंडेनाही ४३ कोटींची लाच- मेधा पाटकर

मुंबई दि.१९ -महाराष्ट्रातील कथित सिंचन घोटाळा प्रकरणी महालक्ष्मी इन्फ्रा प्रोजेक्ट या बांधकाम कंपनीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे नेते सुनील देशमुख यांच्याबरोबरच भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना ४३ कोटी रूपयांची लाच दिली गेली असल्याचा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या समाजसेविका मेधा पाटकर यांनी केला आहे. पाटकर यांनी त्यांच्या आरोपांची पुष्टी करताना सांगितले की आयकर विभागाने वरील कंपनीत छापा टाकला होता. तेव्हा तेथे मिळालेल्या एका डायरीत हे सर्व व्यवहार नोंदविले गेले आहेत.

मेधा पाटकर यांनी याचवेळी यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या सध्या या प्रकरणाचा जो तपास केला जात आहे तो योग्य तर्हेचने केला जात नाही. कारण अनेक महत्त्वाच्या गोष्टीच तपासल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे स्वतंत्र चौकशी आयोगाकडे हे काम सोपविले गेले पाहिजे.

मेधा पाटकर यांचे आरोप सर्वच नेत्यांनी फेटाळून लावले आहेत. मुंडे यांनी पाटकर यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा केला आहे. त्यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार ज्या कंपनीकडून लाच मिळाल्याचा आरोप पाटकर यांनी केला आहे त्या कंपनीतील कोणालाही मुंडे ओळखत नाहीत तसेच त्यांची संबंधितांशी कधी भेटही झालेली नाही. भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनीही पाटकर यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.