नवी दिल्ली/चेन्नई, दि.19 – संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याबाबत दिलेल्या अहवालाच्या मसुद्यावरून राजकीय वादळ उठले आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करूनच सर्व निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. तर, जेपीसीचे अध्यक्ष पी. सी. चाको केंद्र सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजपने केला आहे.
जेपीसीच्या मसुद्यावरून उठले वादळ
स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करणार्या जेपीसीने आपल्या अहवालाचा मसुदा तयार केला आहे. या मसुद्याच्या प्रती काल जेपीसीच्या सदस्यांमध्ये वितरित करण्यात आल्या. जेपीसीने पंतप्रधानांना क्लीन चीट दिल्याचे आणि द्रमुक नेते असणार्या राजा यांच्यावर पंतप्रधानांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवल्याचे या मसुद्यावरून स्पष्ट झाले आहे. हा मसुदा फुटल्यावरूनही वाद निर्माण झाला असतानाच राजा स्वत:च्या बचावासाठी पुढे सरसावले आहेत. पंतप्रधानांशी चर्चा करूनच मी प्रत्येक कृती केली. मंत्रिपदाचा राजीनामा देताना मी हेच म्हणालो. अटकेनंतर न्यायालयातील सुनावणीवेळी माझ्या वतीने हाच युक्तिवाद मांडण्यात आला. माझी भूमिका अतिशय स्पष्ट आहे, असे ते चेन्नईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मी माझे निर्दोषत्व सिद्ध करेन. माझी बाजू मांडणारे टिपण मी जेपीसीला पाठवणार आहे. त्याची छाननी केल्यानंतर जेपीसी मला पाचारण करेल अशी आशा वाटते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
हा जेपीसीचा नव्हे तर काँग्रेसचा अहवाल-भाजप
राजकीय वादळ निर्माण करणार्या 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याबाबतच्या जेपीसीच्या चौकशी अहवालाचा मसुदा फुटल्याबद्दल भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मसुदा फुटणे हा संसदीय औचित्याचा भंग असल्याचे भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. संबंधित अहवाल जेपीसीचा नव्हे तर काँग्रेसचा अहवाल असल्याचेच वाटते, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. दरम्यान, जेपीसीकडून पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देण्यात आलेल्या क्लीन चीटविषयी भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सत्य दडपण्यासाठी काँग्रेस जेपीसीचा वापर करत आहे, असा आरोपही जेटली यांनी केला.