
भोपाळ, दि.19 – भाजपच्या उपाध्यक्षा उमाभारती आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवतील, अशी शक्यता आहे.
भोपाळ, दि.19 – भाजपच्या उपाध्यक्षा उमाभारती आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवतील, अशी शक्यता आहे.
मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री असलेल्या उमाभारती मागील वर्षापासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. मागील वर्षी उत्तर प्रदेशात झालेली निवडणूक लढवून त्या चारखारी मतदारसंघातून विधानसभेवरही निवडून गेल्या. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात या दोन्ही राज्यांत पसरलेल्या बुंदेलखंड या मागास विभागात चारखारी हा परिसर येतो. विधानसभा निवडणुकीपाठोपाठ आता उमाभारती यांना लोकसभा निवडणुकीच्या रणांगणातही उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यांच्यासाठी अमरोहा आणि अलीगढ या लोकसभा मतदारसंघांची चाचपणी करण्यात येत आहे. अर्थात, उमाभारती यांना प्राधान्याने अमरोहामधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली.
मध्य प्रदेशच्या भोपाळ मतदारसंघातून उमाभारती लोकसभा निवडणूक लढवतील, अशीही चर्चा होती. मात्र, ही चर्चा या सूत्रांनी फेटाळून लावली. रामजन्मभूमी आंदोलनातील महत्त्वाच्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या या प्रतिमेचा उत्तर प्रदेशात फायदा होईल, असे भाजपला वाटते. त्यातूनच त्यांना उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्याचा पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा आग्रह असल्याचे समजते. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. त्यामुळेच या राज्यात चांगली कामगिरी व्हावी यादृष्टीने भाजप अधिकाधिक प्रयत्न करत आहे.