संजयच्या तीन मित्रांना सुप्रीम कोर्टाची मुदतवाढ

नवी दिल्ली-बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्तपाठोपाठ गुरुवारी आणखी तीन दोषींना सुप्रीम कोर्टाने शरणागतीसाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामध्ये संजयचा मित्र युसुफ नळवालाचा समावेश असून इसा मेमन आणि अल्ताफ अली यांनाही कोर्टाने दिलासा दिलाय.दरम्यान, झैबुन्निसा काझीच्या याचिकेवर दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे. तर, युसुफ खानची मुदतवाढीची विनंती सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

संजय दत्तचे चित्रपटांचे शूटिंग बाकी असल्याने ही मुदत वाढवून देण्याची विनंती संजयने केली होती. बुधवारी संजय दत्तला कोर्टाने दिलासा दिला होता. त्याच धर्तीवर गुरुवारी आणखी तीन जणांना सुप्रीम कोर्टाने शरण येण्यासाठी महिन्याभराचा कालावधी दिला आहे.गेल्या काही दिवसपासून सुप्रीम कोर्टात युसुफ नळवालाची फेरविचार याचिका प्रलंबित असल्याने त्याला चार आठवड्यांची मुदत मिळाली आहे, तर अल्ताफ अलीची पत्नी प्रेग्नंट असल्याने त्यालाही कोर्टाने दिलासा दिला आहे. इसा मेमनला ब्रेन ट्युमर झाला असून तिच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे तिलाही शरण येण्यासाठी आणखी महिन्याभराचा कालावधी देण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्ट झैबुन्निसा काझीच्या मुदतवाढीच्या याचिकेवर काय निकाल देते, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. झैबुन्निसा, इसाक मोहम्मद हजवणे आणि शरीफ अब्दुल गफूर पारकर या तीन दोषींना शरण येण्यासाठी मुदतवाढ देण्यास सुप्रीम कोर्टानं मंगळवारी नकार दिला होता. परंतु, दुस-याच दिवशी खंडपीठानं संजय दत्तला मुदतवाढ दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. झैबुन्निसाला एक आणि संजूबाबाला दुसरा न्याय कसा?, असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. त्यामुळे दुपारी दोन वाजता झैबुन्निसाबाबत कोर्ट काय निकाल देतं, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.