वाघाचे ८० टक्के हल्ले केवळ महिलांवरच

मुंबई दि. १८ – वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या व्यक्तीला चार लाख व गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला एक लाख रुपये देण्यात येणार असल्याचे वन राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सांगितले. तसेच राज्यात आतापर्यंत वाघाचे ८० टक्के हल्ले हे केवळ महिलांवरच झाले आहेत. सरपणासाठी अथवा शेतात काही कामासाठी गेल्या असताना हे हल्ले झाल्याचेही जाधव म्हणाले.

आमदार शोभाताई फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. यासाठीचा (जीआर) अध्यादेश मार्चमध्ये काढण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी सुरू आहे. असे असले तरी जानेवारीपर्यंत वाघांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी अथवा जखमी झालेल्या व्यक्तीलाही मदत देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. वाघांच्या हल्ल्यासंदर्भात काही वाघांना ’मायक्रोचिप’ लावणे राहिले असले तरी त्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.