त्या तीन आमदारांचे निलंबन रद्द होणार

मुंबई दि. १८ – पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण करणार्या  त्या तीन आमदारांचे निलंबन रद्द होण्याची शक्यता आहे. एका वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदारांचे निलंबन मागे घेण्याबाबतचा प्रस्ताव आज विधानसभेत मांडला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास राजन साळवी, प्रदीप जयस्वाल आणि जयकुमार राव यांचे निलंबन रद्द होण्याची शक्यता आहे.

मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आली होती. त्या समितीचा अहवाल आज विधानसभेत मांडण्यात आला. समितीच्या अहवालात केलेल्या शिफारशीनंतर आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या समितीने बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर आणि मनसे आमदार राम कदम यांना दोषी ठरवले आहे.