वॉशिंग्टन, दि.१८- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना विषारी पत्र पाठवण्यार्याला एफबीआयने मिसिसिप्पी येथून अटक केली आहे. पॉल केविन कर्टिस (४५)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ओबामांना विषारी पत्र पाठवणारा अटकेत
रीसीन नावाच्या विषारी रसायनाचाच या पत्रासाठी वापर करण्यात आला होता. मात्र सुरक्षा यंत्रणेनं संशय आल्यानंतर हे पत्र ताब्यात घेऊन, त्याची पाहणी केली. त्यात ही बाब स्पष्ट झाली. रिसीन हे विषारी द्रव्य कॅस्टरच्या बीयांपासून बनवलं जातं.
यापूर्वी बल्गेरीयाच्या जॉर्गी मार्कोव्ह याला रीसीन देऊन लंडनमध्ये ठार मारण्यात आलं होतं. दरम्यान या घटनेनंतर अमेरीकेच्या सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
१९४० साली अमेरिकेच्या सैन्याने युद्धात रिसीनच्या वापराचा प्रयोग केला होता. रिसीन श्वसनावाटे शरीरात गेल्यास श्वास घेण्यास त्रास, ताप, कफ, मळमळ होणे ही लक्षणे आढळतात. तसेच श्वसनक्रिया हळूहळू थांबते. रिसीन खाण्यावाटे शरीरात गेल्यास उलटया, जुलाब, रक्तदाब कमी होणे तसेच लघवीतून रक्त जाणे ही लक्षणे आढळतात.
