अखेर अडवाणी भारी

भाजपाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा यावरून सुरू असलेल्या राजकारणात लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदीवर मात केली आहे. नरेंद्र मोदी यांनी संघ परिवाराचा अप्रत्यक्ष पाठिंबा, गुजरातमध्ये केलेले काम, वक्तृत्व आणि प्रसिध्दीचे तंत्र यांच्या साह्याने या मैदानात उडी घेतली होती. परंतु अडवाणी त्यांच्या मागे होते. आता अडवाणींनी घटक पक्षांचा पाठिंबा या एका घटकाच्या जोरावर मोदींवर मात केली आहे. रालो आघाडीतले राजकारणच तसे आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार भाजपाचाच असेल हे खरे पण तो कोण असावा याबाबत घटक पक्ष काही सूचना देऊ शकतात आणि मोदी नको असा हट्ट धरू शकतात. तो भाजपाला मानावा लागतो. या गोष्टीची जाणीव असलेल्या अडवाणींनी तेवढ्या एका निर्णायक घटकाच्या जोरावर मोदींची उमेदवारी मागे पाडली आहे आणि आपले घोडे बरोबर पुढे सरकवले आहे. नेते लालकृष्ण अडवाणी हे जर पंतप्रधान होणार असतील तर ते आपल्याला चालतील अशी भूमिका आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांनी घेतली आहे आणि या भूमिकेमुळे भाजपाचे आणि रालो आघाडीचेही पंतप्रधानपदाचे राजकारण पूर्णपणे बदलून गेले आहे. 2004 सालपासून पडद्यामागे गेलेले लालकृष्ण अडवाणी पुन्हा एकदा राजकारणाच्या रंगमंचावर प्रविष्ट झाले आहेत. येत्या शनिवारी आघाडीची बैठक होणार असून तिच्यामध्ये अडवाणी यांना आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणावे असा निर्णय होण्याची शक्यता आहे. एकंदरीत गेली दहा वर्षे उपेक्षित राहिलेले अडवाणी आता उजेडात येत आहेत. अडवाणी यांचे पंतप्रधान होणे हे घटक पक्षांवर अवलंबून आहे आणि खुद्द अडवाणी यांना याची जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी गेल्या दहा वर्षापासून आपली प्रतिमा बदलण्यास सुरूवात केली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी पाकिस्तानात जाऊन बॅरीस्टर महंमदअली जीना यांच्या स्मारकाला भेट देऊन त्यांचे गुणगान केले होते. त्यामुळे संघाचे नेते संतापले असले तरी देशामध्ये अडवाणींची कट्टर हिंदुत्ववादी ही प्रतिमा पुसली जायला मदत झाली आणि ते सौम्य नेते ठरले. एक काळ असा होता की वाजपेयी सौम्य आणि अडवाणी कट्टरतावादी ठरले होते. किंबहुना त्यांच्या तशा प्रतिमा निर्माण केल्या गेल्या होत्या. पण आता मात्र मोदी कट्टरतावादी आणि अडवाणी सौम्य अशी प्रतिमा निर्मिती झाली आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी मतदारांना मोदी हवेसे वाटत आहेत पण संघ परिवाराच्या बाहेरच्या लोकांना अडवाणी हवेसे वाटायला लागले आहेत. 15 वर्षापूर्वी अशा भूमिका अडवाणी आणि वाजपेयी यांच्या बाबतीत झाल्या होत्या. तेव्हा अडवाणी कट्टरतवादी आणि वाजपेयी उदारमतवादी दाखवले गेले होते. अडवाणी यांनी त्यानंतर आपली कट्टर प्रतिमा बदलून सौम्य प्रतिमा दाखवायचा प्रयत्न केला आणि त्याचा त्यांना फायदा होत आहे. आपल्याला असा काहीतरी प्रयास करावा लागेल हे त्यांनी ताडले होते. तशी सौम्य प्रतिमा निर्माण झाली तरच रालो आघाडीचे घटक पक्ष आपल्याला स्वीकारतील असा त्यांचा कयास होता. त्यांच्या या जीनास्तुतीमुळे संघ परिवार त्यांच्यावर रागावला आणि परिवाराने त्यांना जवळजवळ बहिष्कृतच केले. मात्र अडवाणी यांना आत्ता जीना पावायला लागले आहेत. मोदी पेक्षा सौम्य नेता म्हणून घटक पक्षांनी त्यांना स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. 2003 साली अडवाणींनी जीनास्तोत्र गायिले पण त्याचा फायदा त्यांना आता मिळत आहे. गेल्या डिसेंबरपासून म्हणजे गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकल्यापासून मोदीच पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असा भाजपामधील एका गटाचा आग‘ह तीव‘ झाला होता. मोदी यांनासुध्दा सर्वांचे समर्थन मिळणे सोपे जावे यासाठी त्यांचीही प्रतिमा विकासपुरुष अशी करण्याचा प्रयत्न चालू झाला होता. नितीशकुमार यांनी कितीही विरोध केला तरी मोदीच आपले उमेदवार असतील असे भाजपाचे नेते ठामपणे म्हणायला लागले होते. उद्या चालून भाजपा प्रणित रालो आघाडीला दिल्लीतली सत्ता मिळण्याची संधी मिळालीच तर त्या स्थितीत भाजपाचा उमेदवार हाच पंतप्रधान होणार हे ठरलेलेच आहे आणि त्या स्थितीत आपला उमेदवार मोदीच असतील मग नितीशकुमार यांनी बिहारमधली आघाडी मोडली तरी चालेल असेही भाजपा नेते बोलायला लागले होते. परंतु रालो आघाडीला बहुमत मिळाले तरी भारतीय जनता पार्टी वाट्टेल ते करायला मोकळी राहणार नाही. आघाडीमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकत तेवढी नाही. भाजपाचे सत्ताग‘हण बर्‍याच अंशी घटक पक्षांवर अवलंबून आहे आणि घटक पक्षापुढे भाजपाला झुकावे लागेल हेही दिसायला लागले आहे. म्हणूनच नितीशकुमार यांनी मोदींच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतल्याबरोबर शिवसेनेनेसुध्दा वेगळा सूर लावला. आघाडीतला मोठा पक्ष म्हणून भाजपाचा उमेदवार पंतप्रधान होईल आणि पंतप्रधान कोणाला करायचे हे भाजपाने ठरवावे आम्ही आपले त्यांना पाठिंबा देऊ मोकळे होऊ असे घडणार नाही अशी धमकीच शिवसेनेने दिली. भाजपाने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार मोदी यांना वगळून कोणीही ठरवावा, तो घटक पक्षांना सांगावा अन्यथा वेगळेच महाभारत घडेल अशी ठोस भूमिका शिवसेनेने घेतली. त्यापाठोपाठ अकाली दलानेसुध्दा मोदी चालणार नाहीत असे बजावले. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी भाजपाच्या कोणत्याही नेत्याने मोदी यांच्या बाबतीत किंवा पंतप्रधानपदाच्या बाबतीत बयानबाजी करू नये असे बजावले असले तरी काल तिघां ज्येष्ठ नेत्यांनी मोदी यांच्या विरोधात अगदी 10 नंबरचा लाल बावटा फडकावला. मध्यप्रदेशाचे मु‘यमंत्री शिवराजसिंह चौहान, यशवंत सिन्हा आणि जसवंतसिंग या तिघांनी अडवाणींच्या नावाचा पुकारा केला. म्हणजे भाजपाचा एक गट आणि तीन घटक पक्ष मोदींच्या विरोधात आहेत. त्यांना डावलण्याची हिंमत भाजपात नाही. त्यामुळे त्यांच्यापुढे झुकून भाजपाला अडवाणींनाच उमेदवार करावे लागणार आहे.

Leave a Comment