करिश्मा कपूरला २९ एप्रिलला हजर राहण्याचे आदेश

नागपूर दि.१८ – करार करूनही निर्मल नगरीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबद्दल निर्मल उज्ज्वल नगरीचे संचालक प्रमोद मानमोडे यांनी अभिनेत्री करिश्मा कपूरविरुद्ध ३५ लाखांच्या नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात न्यायालयाने करिश्मा कपूरला २९ एप्रिलला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

जानेवारी महिन्यात उमरेड मार्गावरील निर्मल नगरीच्या उद्धाटन कार्यक्रमासाठी करिश्मा प्रमुख अतिथी होती. निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑॅपरेटिव्ह सोसायटीने करिश्माला या कार्यक्रमासाठी आणण्यासाठी मेसर्स मेट्रीक्स इंडिया एटरटेमेंट कन्सलटंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत करार केला होता. करिश्माने उपस्थित राहण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु मुलगा आजारी असल्याने ती हजर राहू शकली नाही. त्यामुळे मानमोडे यांनी नंदनवन पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. दखलपात्र गुन्हा होत नसल्याने पोलिसांनी मानमोडे यांना न्यायालयात दाद मागण्यास सांगितले. त्यानंतर मानमोडे यांनी न्यायालयात धाव घेतली. करिश्माविरुद्ध ३५ लाखांच्या नुकसान भरपाईचा दावा ठोकला.

याप्रकरणात प्रथम श्रेणी न्यायालयाने करिश्माला समन्स बजावून २९ एप्रिलला सकाळी ११ वाजता कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोर्टाने या प्रकरणात बजावलेल्या नोटीसमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची ३० दिवसांच्या आत उत्तर देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

Leave a Comment