सुपर ओव्हर मध्ये बंगळूरूचा विराट विजय

बंगळूरू – आयपीएलच्या सहाव्या हंगामात सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात बंगळूरूने दिल्लीवर पाच धावांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामातील सुपर ओव्हरमध्ये गेलेला हा दुसरा सामना होय. याआधी हैदराबाद आणि बंगळूरूचा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता. त्यावेळी हैदराबादने बंगळूरूवर विजय मिळवला होता.  दिल्लीचा हा स्पर्धेतील सलग पाचवा पराभव ठरला.

दोन्ही संघांनी २० षटकात प्रत्येकी १५२ धावा केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये बंगळूरूकडून ख्रिस गेल आणि एबी.डिव्हिलियर्स फलंदाजीसाठी आले. तर दिल्लीकडून उमेश यादवने गोलंदाजी केली. पहिल्या तीन चेंडूत बंगळूरूने केवळ तीन धावा केल्या. चौथा चेंडू वाया गेला. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर डिव्हिलियर्सने षटकार ठोकले.

सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी १६ धावांचे आव्हान दिल्लीपुढे होते. बंगळूरूकडून रामपॉलने गोलंदाजी केली. तर दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर आणि इरफान पठाण हे दोघे फलंदाजीसाठी आले. रामपॉलच्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नर बाद झाला. त्यानंतर पठाणने तिस-या चेंडूवर चौकार मारला. तिस-या चेंडूवर पठाणला धाव घेता आली नाही. तर चौथ्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला. पाचव्या चेंडूवर पठाणने एक धाव घेतली. सहाव्या चेंडूवर विजयासाठी पाच धावांची गरज होती. मात्र रामपॉलने अखेच्या चेंडूवर विकेट घेतली.

त्याआधी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या सामन्यात बंगळूरू रॉयल चॅलेंजर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीची फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले.  दिल्लीकडून कर्णधार माहेला जयवर्धनेने सर्वाधिक २८ धावा केल्या. या सामन्यातही सेहवागला मोठी खेळी करण्यात अपयश आले.  दिल्ली वीस षटकात पाच बाद १५२ धावा केल्या.

विजयासाठी १५२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बंगळूरुची सुरुवात चांगली झाली होती. बंगळूरूने तीन बाद १२९ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर केवळ नऊ धावांमध्ये बंगळूरूची अवस्था सात बाद १३८ झाली. अखेरच्या षटकात बंगळूरूला विजयासाठी  धावांची गरज होती. मात्र बंगळूरूला ११ धावा करता आल्या. विराट कोहली सामनावीर ठरला.

Leave a Comment