साध्या, सरळ आयुष्याची नौटंकी

बॉलिवुडमध्ये वर्षभरात प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांपैकी जवळपास निम्मे चित्रपट विनोदी असतात. बॉलिवुडच्या विनोदीपटाचा एक ढाचा तयार झालेला आहे. त्याच ढाच्यातील चित्रपट सातत्याने आपल्यासमोर येतात. बर्‍याचदा विनोद निर्मितीसाठी ओढून-ताणून लेखन केले जाते. अशा स्थितीत आपल्यासमोर एखादी निरागस विनोदी कथा येते आणि आपल्याला जाणीव होते की आपण किती रटाळ विनोदी चित्रपट पाहिले. ‘नौटंकी साला’ वेगळ्या प्रकारची फ्रेश कॉमेडी आहे.

‘नौटंकी साला’ ही कथा आहे राम परमार उर्फ आरपी (आयुष्यमान खुराना) आणि मंदार लेले ( कुणाल रॉय कपूर) या दोन युवकांची आर.पी हा एका मध्यमवर्गीय घरातील मुलगा… त्यामुळे इतरांची दु:खे त्याला पाहवत नाहीत. कोणत्याही ठिकाणी मित्रांच्या मदतीसाठी हा सर्वांत पुढे असतो. एके दिवशी रात्रीच्या वेळी आरपी गाडीतून जात असता त्याला एक युवक आत्महत्येचा
प्रयत्न करत असल्याचे दिसते. तो त्या युवकाला वाचवतो आणि आपल्या घरी घेऊन येतो. त्यावेळी त्याला समजते की, त्या युवकाचा प्रेमभंग झाला आहे. त्यामुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मदतीसाठी धावणारा आरपी त्याच्या गर्लफ्रेंडचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो.

आरपी एका नाटक कंपनीत कामाला आहे. त्याने रावणलीला नावाचे नाटक बसवले आहे. तो त्यामध्ये दिग्दर्शनाच्या जबाबदारीबरोबरच रावणाची भूमिका तो साकारतो. आजपर्यंत रावणलीलाचे १५०० प्रयोग झाले आहेत. मंदारला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असलेला आरपी त्याला आपल्या नाटकात रामाची भूमिका देऊन त्याचे आयुष्य सुधारण्याचा खटाटोप करतो. यासाठी तो निर्मात्याचा विरोध पत्करतो आणि खरा चित्रपट सुरू होतो.

मित्रांसाठी काही पण करणारा आरपी मित्राची कशी मदत करतो, असे साधे कथानक ‘नौटंकी साला’चे आहे. मात्र रोहन सिप्पीने एका वेगळ्या ढंगात हा चित्रपट आपल्यासमोर आणला आहे. वास्तविक जीवनाला रामायणाच्या पानांमध्ये शोधणार्‍या दिग्दर्शकाने एक नवी गोष्ट प्रेक्षकांच्या समोर ठेवली आहे.

अनेक गोष्टी प्रेक्षकांना आपल्याशा वाटतील अशा पद्धतीने दिग्दर्शकाने मांडल्या आहेत. कोणत्याही प्रकारचे चित्र – विचित्र हावभाव, अश्‍लील विनोदांचा वापर न करताही एक चांगला, दर्जेदार विनोदी चित्रपट तयार करता येऊ शकतो, हे यानिमित्ताने रोहन सिप्पीने दाखवून दिले आहे. मूळ कथेत दम
नसला तरी दिग्दर्शकाने ज्या पद्धतीने मांडणी केली आहे त्याला दाद द्यावीच लागेल.

आरपीच्या भूमिकेत आयुष्यमान खुराणा एकदम फिट बसला आहे. विकी डोनर नंतर आलेला त्याचा हा दुसरा चित्रपट आहे. दिग्दर्शकाला नेमके काय सांगायचे आहे ते एकदम मस्त पद्धतीने आयुष्यमानने आपल्यासमोर आणले आहे. त्याला तशीच उत्तम साथ कुणाल रॉय कपूरने दिली आहे. पूजा साळवी आणि एलवन शर्मा यांना अभिनयात फारसा वाव नाही. चित्रपटाचे संगीत ही सुद्धा ’नौटंकी साला’ची जमेची बाजू आहे. यातील दोन गाणी आयुष्यमानने गायली आहेत. एकंदरीत वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलेला हा विनोदी चित्रपट आवर्जून पाहण्यासारखा आहे.

चित्रपट – नौटंकी साला, निर्मिती – टी – सिरीज, रमेश सिप्पी, दिग्दर्शक – रोहन सिप्पी, कलाकार – आयुष्मान खुराणा, कुणाल रॉय कपूर, इवलिन शर्मा, पूजा साळवी

Leave a Comment