पुणे मुंबई आराम बस विना वाहक धावणार

पुणे, दि. 17 – स्वारगेट – ठाणे, स्वारगेट – दादर दरम्यान धावणार्‍या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ( एसटी) निमआराम बस (हिरकणी) 1 एप्रिल पासून विना वाहक करण्यात आल्या आहेत. या मार्गावरून एसटीला सर्वधिक उत्पन्न मिळते, मात्र या बस विना वाहक केल्यापासून भारमान कमी झाले आहे. यामुळे या बस पुन्हा वाहकसह सोडण्यात याव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव दिलीप परब यांनी दिला आहे.

पुण्याहुन मुंबईला जाणार्‍या निम आराम बस एसटील्ला सर्वधिक उत्पन्न देतात. 31 मार्च 2013 पुर्वी या मार्गावर सरासरे 72.5 टक्के भारमान होते ते आता 46 ट्नयावर आल्याचे परब यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. बस सोबत वाहक असल्यास प्रवाश्यांना सोयस्कर असते, आता बसला वाहक नसल्याने वृद्ध, अपंग प्रवाश्यांची गैरसोय होत आहे. तसेच कोकण भवन, वाशी, नेरूळ, मैत्री पार्क या ठिकाणी जाणार्‍या प्रवश्यांना 140 व 160 ऐवजी थेट मुंबएईचे 195 व 210 रूपयाचे भाडे भरावे लागते. या प्रवाश्यांना 60 ते 70 रूपयांचा भुर्दंड भरावा लागत आहे. यामुळे या ठिकाणचे प्रवाशी कमी झाले आहेत असे परब यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या विषयी बोलताना स्वारगेट आगाराचे वरिष्ठ व्यवस्थापक विजयकुमार दिवटे म्हणाले, स्वारगेट – ठाणे, स्वारगेट – दादर दरम्यान धावणार्‍या निम आराम बस विनावाहक सोडण्याचा निर्णय घेऊन पंधरा दिवसांचाच कालावधी उलटला आहे यामध्ये उत्पन्नावर परिणाम झाल्यचे किंवा भारमान कमी झाल्याचे आढळून आले नाही. भारमान समजण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी गृहीत धरावा लागतो. या मार्गावर विविध आगाराचे वाहक काम करतात त्यामुळे उत्पन्नाचा नेमका आकडा समजण्यासाठी सर्व माहितीचे संकलन आवश्यक असते आणि ते एक महिन्यानंतर मिळते असे दिवटे यांनी स्पष्ट केले.

‘हिरकणी’ ला लोणावळा थांबा
लोणावळ्याहून पुणे-मुंबईला जाणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने स्वारगेट-मुंबई दरम्यान धावणार्‍या सुमारे 32 निमआराम (हिरकणी) गाड्या लोणावळ्याला थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते लोणावळा प्रवासासाठी 120 रुपये भाडे आकारण्यात येत आहे. याव्यतिरिक्त पुणे-स्टेशन ते दादर मार्गावर धावणार्‍या 42 निमआराम बस लोणावळ्याला थांबणार नाहीत. .या निर्णयामुळे लोणावळ्याहून पुणे-मुंबईला ये-जा करणार्‍या प्रवाशांना या बसेस उपयुक्त ठरणार असल्याचे एसटीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
————————————-