महाराष्ट्राच्या गृहखात्याने आणि पोलीस दलाने नवनवे विक्रम करायला सुरूवात केली आहे. या खात्यात एक मंत्री होते ते खुनाच्या आरोपात सापडले. ज्या खात्याने लोकांचे गुन्हे शोधून काढले पाहिजेत त्या खात्याच्या मंत्रिपदावर खुनाचा आरोप असलेले नेते नेमले जातात हा एक विक्रमच आहे. अर्थात तो महाराष्ट्रापुरता तरी विक्रम आहे. आणखी एक गृहराज्यमंत्री होते. त्यांनीही पुण्याच्या काही पोलीस ठाण्यात आपल्या नावाची नोंद केली होती. आता सोलापूर जिल्हयातल्या एक गृह राज्यमंत्र्यांवर खुनाचा खटला जारी आहे.
मंत्री असले आहेतच पण अधिकारीही त्यापेक्षा वरचढ आहेत. राज्याच्या एका वरिष्ठ अधिकार्याला म्हणजे माजी अतिरिक्त पोलीस आयुक्ताला लाच घेतल्याच्या प्रकरणात पाच वर्षांची सक्तमजूरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आपण आपल्या कल्पनेत असे नोंदले आहे की पोलीस म्हणजे चोरांना जेलमध्ये टाकणारा अधिकारी. पण आता आपण पाहतोय की एक पोलीसच जेलमध्ये गेला आहे. हाही काही साधा पलीस नाही. पोलिसांचा साहेबही नाही तर पोलिसांच्या साहेबांचा साहेब आहे. एवढा मोठा साहेबच तुरुंगात जाऊन पडला आहे.
या अधिकार्याचे नाव ए. के, जैन. त्यांनी आपल्याच खात्यातल्या एका पोलीस अधिकार्या्ला लाच मागितली होती. ही तर कमालच झाली. पोलीस सामान्य माणसाकडून, गुन्हेगारांकडून पैसे खातात पण आपल्याच खात्यातल्या अधिकार्याकडून पैसे खाण्याचा विक्रम या जैन यांनी केला. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी वेगळ्याच प्रकारे पण रंगेहाथ पकडले होते. २००० साली घडलेल्या या घटनेचा तपास होऊन खटला आजवर चालला आणि जैन यांना सक्तमजुरीची शिक्षा फर्मावण्यात आली.
आयपीएस दर्जाच्या एवढ्या ज्येष्ठ अधिकार्याला लाच घेतल्या बद्दल एवढी शिक्षा होण्याचा महाराष्ट्रातला तरी पहिलाच प्रकार आहे. या प्रकरणात जैन यांनी प्रत्यक्षात लाच घेतली नव्हती पण आपल्या प्रसन्न लढा या मित्राकडून ती घेतली होती. पोलीस निरीक्षक संजीव कोकीळ याच्याकडून ही लाच घेण्यात आली होती. हा प्रकार मुंबईत घडला होता. कोकीळ याच्या हद्दीत एक बियर बार रात्री उशिरापर्यंत उघडा होता. त्यावरून त्याला खात्याची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तिचा निर्णय जैन यांच्याकडे होता कारण ते या काळात अतिरिक्त पोलीस आयुक्त होते.
ही चौकशी चालली असती तर कोकीळ याला निलंबित करता आले असते. ते टळावे यासाठी कोकीळने आपल्याला पाच लाख रुपये द्यावेत अशी मागणी जैन यांनी लोढाच्या मध्यस्थीने केली होती. कोकीळ याने ते कबूल केले आणि पैसे जमा करायला काही वेळ लागेल असे म्हणून मुदत मागून घतली. दरम्यानच्या काळात त्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यां शी संपर्क साधला. त्यांनी सापळा रचून लोढाला पैसे घेताना पकडले. त्याने ते घेतले असते आणि गप्प बसला असता तर जैन यांना या प्रकरणात अडकण्याचे कारण नव्हते पण त्यांनी आणि लोढा यांनी बेफिकिरी दाखवली. एक कारवायीला तोंड देणारा अधिकारी फार भानगडीत कशाला पडेल असा विचार करून फार सावधानता बाळगली नाही.
कोकीळ याने पैसे देताच लोढा यांनी जैन यांना फोन करून, या मूर्खाने दोन किलो मिठाई आणली आहे, ती घेऊ का असा प्रश्न विचारला. जैन यांनीही त्याला प्रतिसाद दिला. परिणामी लाच घेण्याच्या या प्रकरणात दोघेही अडकले. आता जैन (आता वय ६० वर्षे) यांना तर पाच वर्षे कारागृहात जावेच लागणार आहे पण लोढालाही तेवढीच शिक्षा झाली आहे. या दोघांनाही कैदेशिवाय एक लाख २५ हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात नेहरुनगर भागातल्या एका बेकायदा बांधकामावर कायदेशीर कारवायी न करण्याच्या बदल्यात लाच घेताना ३६ पोलिसांना कॅमेर्यात बंद करण्यात आले होते. त्या सर्वांना निलंबित करण्यात आले आहे.
कालचा दिवस पोलिसांच्या लाचखोरीला वाचा फुटण्याचाच होता. पण जैन यांनी आपल्याच हाताखाली काम करणार्या पोलीस अधिकार्याला लाच मागितली. कोकीळ हा ज्येष्ठ पोलीस निरीक्षक होता आणि त्याला आयुक्ताच्या रँकमध्ये बढती मिळणार होती. तो पोलिसांसाठी एक पीडा ठरला होता. आपल्याच पोलीस दलातल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तो झगडत होता. पण दरम्यान गतवर्षी त्यालाच सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्याच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते आणि आपल्या परिसरातली अतिक्रमणे हटवण्यात त्याने पुढाकार घेतला होता. त्यात त्याने अनेक गैर प्रकार केले असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.
सेवेतून बडतर्फ केले तरीही त्याने या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागितली नाही. सध्या सेवेत नसलेल्या कोकीळने जैन यांना शिक्षा सुनावली जाताच पेढे वाटले. लोकांनी अशा अधिकार्यांवर असा अंकुश ठेवला तर भ्रष्टाचार कमी होईल असे त्याने म्हटले पण त्याच्या भ्रष्टाचाराचे काय हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. हे खातेच किती किडले आहे हे या प्रकारांवरून दिसून येते.