स्फोट घडविणारयाना योग्य उत्तर दिले जाईल – ओबामा

बोस्टन दि.१६ – अमेरिकेतील बोस्टन शहरात मॅरेथोन शर्यतीदरम्यान झालेल्या दोन बॉम्बस्फोटानंतर अमेरिकी नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्फोट घडविणार्‍यांना कुठूनही शोधून काढले जाईल आणि त्यांच्या कृतीला योग्य उत्तर दिले जाईल असा दिलासा देतानाच स्फोटाची झळ बसलेल्यांना सर्व ते सहाय्य देण्याचे आणि त्यांना पूर्ण न्याय देण्याचे वचन अमेरिकी नागरिकांना दिले आहे.

या दोन्ही बॉम्बस्फोटांचा तपास लगोलग सुरू झाला आहे त्यामुळे आत्ताच त्यावर अधिक बोलणे योग्य नसले तरी हे स्फोट दहशतवादाचाच प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. बॉम्बस्फोटातील पिडीतांसाठी आज रात्री देशभर प्रार्थनाही केली जाणार आहे असे सांगण्यात आले. तसेच अमेरिकेतील अन्य महत्त्वाच्या शहरांत म्हणजेच न्यूयॉर्क, शिकागो, लॉस एंजलिस, वॉशिग्टन यांसह अनेक मोठ्या शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून व्हाईट हाऊसची सुरक्षाही वाढविली गेली आहे.

देशातील महत्त्वाच्या ठिकाणी जादा सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून खबरदारीचा उपाय म्हणून बोस्टनवरून विमान उड्डाणांना परवानगी नाकारण्यात आली आहे. गुप्तचर संस्थांच्या म्हणण्यानुसार हा दहशतवादी हल्लाच असून अमेरिकेबाहेर जाणार्या. विमानांतील प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. याचा अर्थ स्फोट करणारे बाहेर देशातून आले असावेत असे संकेत गुप्तचर संस्थांना मिळत आहेत.