शिवसेनेचा आणखी एक आमदार निलंबित

मुबई – उस्मानाबाद येथील पाणीप्रश्नी विधानसभेत गोंधळ घालणारे शिवसेनेचे आमदार ओम
राजेनिंबाळकर यांना निलंबित करण्यात आले. विधानसेभत दुष्काळावरील चर्चेदरम्यान गोंधळ घातल्याने तसेच राजदंडापर्यंत धडक दिल्याने आमदार राजेनिंबाळकर यांना आपले सदस्यत्व वर्षभरासाठी गमवावे लागले.

मंगळवारी विधानसभेत दुष्काळावर चर्चा सुरू होती. यावेळी उस्मानाबाद येथील पाणी योजनेचा प्रश्न आमदार राजेंनिंबळकर यानी उपस्थित केला होता. या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप होता. मात्र त्यांच्या आरोपावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. जोरजोरात घोषणा देत ते वेलमध्ये उतरले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. ते राजदंडाला हात घालणार एवढ्यातच त्यांना रोखण्यात आले. या गोंधळाची शिक्षा म्हणून ओमराजेंना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वी विधानभवनात पोलीस अधिका-याला मारहाण केल्याने आधीच शिवसेनेच्या दोन आमदारांना निलंबित करण्यात आलेले आहे. ओमराजेंच्या निलंबनामुळे शिवसेनेच्या निलंबित आमदारांचा आकडा आता तीन झाला आहे.