बोस्टन शहरात दोन बॉम्बस्फोट, ३ ठार, १३५ जखमी

बोस्टन – अमेरिकेतील बोस्टन शहरात स्थानिक वेळेनुसार सोमवारी दुपारी मॅरेथॉन दरम्यान झालेल्या दोन बॉम्बस्फोटांत तीन जण ठार, तर शेकडो जखमी झाले आहेत. हा हल्ला दहशतवादी असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असून, अमेरिकेतील सर्व प्रमुख शहरांमध्ये अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

या स्फोटांमागील अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नसून, अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. स्फोटांचा तपास ‘एफबीआय’कडे देण्यात आला आहे. सुमारे २३ हजार स्पर्धकांचा समावेश असलेल्या या मॅरेथॉनमध्ये विजेत्यांनी विजयी रेषा पार केल्यानंतर काही सेकंदातच पहिला स्फोट झाला आणि तेथूनच जवळच दुसरा स्फोट झाला. स्फोट झालेल्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे शेकडो जखमी असून, त्यातील १७ जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये एका आठ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.

या स्फोटानंतर राष्ट्राला संबोधित करताना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले, की या स्फोटाबद्दल दोषी असलेल्यांना शोधण्यात येईल आणि त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. स्फोटामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे अद्याप निश्‍चित नसून, याचा शोध घेण्यात येत आहे. अशावेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन बोस्टनवासियांना सहकार्य केले पाहिजे.

बोस्टनमधील मॅरेथॉन स्पर्धा ही अमेरिकेतील क्रीडा स्पर्धांपैकी महत्त्वाची आहे. ही मॅरेथॉन पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. या मॅरेथॉनमध्ये स्फोट झाल्याने पुढील आठवड्यात होणाऱ्या लंडन मॅरेथॉनवरही भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Comment