थंड ठेवणारा शर्ट आणि सोबत उर्जा निर्मितीही

कलकत्ता दि.१६ – अंगात घातल्यावर गार वाटेल आणि सौर सेलद्वारे उर्जानिर्मितीही होईल असा शर्ट कलकत्त्याच्या एका शास्त्रज्ञाने तयार केला असून या शर्टमध्येच सौर ऊर्जेचे सेल तसेच छोटे पंखे बसविले गेले आहेत. या पंख्यांमुळे शर्ट घालणार्या ला ऐन उन्हातून जातानाही थंड वाटणार आहे आणि सौर सेलमुळे होणार्‍या उर्जानर्मितीवर मोबाईल, टॅब्लेट वा अन्य डिजिटल उपकरणे चार्जही करता येणार आहेत.

हा शर्ट तयार करणार्‍या शास्त्रज्ञाचे नांव आहे संतीपद चौधरी. त्यांना यापूर्वी विज्ञानात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या  अॅशडेन पारितोषिकानेही गौरविले गेले आहे. ते बंगाल इंजिनिअरिंग विद्यापीठात काम करतात. संतीपद सांगतात या शर्टच्या धाग्यातच छोटे सोलर सेल बसविण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अन्यथा हे सेल खिशातही बसविता येतात. या शर्टमध्ये  दोन ते चार अगदी छोटे पंखेही बसविले गेले आहेत. साडेपाच फूट उंचीच्या माणसाच्या मापाचा शर्ट ४०० वॉट वीज निर्मिती करू शकतो. त्यावर इलेक्ट्रोनिक उपकरणे चार्ज करता येतात.

किमतीचे म्हणाल तर कोणताही ब्रँडेड शर्ट किमान १ हजार रूपयांना मिळतो. हा शर्ट साधारणपणे १६०० रूपयांपर्यंत मिळू शकणार आहे. संतीपन यांनी या शर्टसंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाला सादर केला आहे असेही समजते.