मोदीसाठी भाजप जेडीएसला सोडचिठ्ठी देणार

नवी दिल्ली- मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला विरोध करणा-या नितीश कुमार यांच्या दबावाला बळी न पडण्याचे भाजपने ठरवले आहे. पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव जवळपास निश्चित केलेल्या भाजपने मोदींसाठी जेडीएसला धक्का सोडचिठ्ठी देणार आहे. भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी १८ एप्रिल रोजी बिहारमधील भाजप नेत्यांची बैठक बोलावली असून त्यात याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

जेडीयुच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत रविवारी एक ठराव पास केला. त्यात पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्यासाठी भाजपला डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. शिवाय हा उमेदवार धर्मनिरपेक्ष असावा अशी अट घातली आहे. मोदींचा पत्ता कट करण्यासाठीच ही अट घालण्यात आल्याचे स्पष्ट आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीसमोर बोलताना नितीश कुमार यांनी मोदींवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला होता. त्यामुळेही भाजपमध्ये तीव्र नाराजी आहे. मोदी भाजपला २०० जागा सहज मिळवून देऊ शकतात, असा विश्वास भाजपला वाटतो आहे. बिहारमधील २०-२२ जागांसाठी त्यावर पाणी सोडण्यास भाजपची तयारी नसल्याचे समजते. त्यामुळेच जेडीयुच्या आततायीपणाविरोधात भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.