सॅमसंगचा विक्री वाढीचा नवा फंडा- कॅश बॅक योजना

मुंबई दि.१५ – कोरियन इलेक्ट्रोनिक कंपनी सॅमसंग ने त्यांचे हाय एंड फोन भारतीय बाजारात अधिक संख्येने खपावेत यासाठी कॅश बॅक योजना आणली असून ही योजना कंपनीच्या गॅलॅक्सी रेंजसाठी आहे. यापूर्वीही कंपनीने इएमआय योजनाही राबविली होती. या योजनेला मिळालेले भक्कम यश पाहूनच कंपनीने आता कॅश बॅक योजना आणली आहे.

कंपनीचे उपाध्यक्ष असीम वारसी या संदर्भात माहिती देताना म्हणाले की स्टँडर्ड चार्टर्ड आणि आयसीआयसीआय या बँकाच्या माध्यमातून कॅश बॅक योजना राबविली जाणार असून गॅलॅक्सी नोट दोन, एस थ्री, गॅलॅक्सी ग्रँड, गॅलॅक्सी टॅब टू व गॅलॅक्सी कॅमेरा या उत्पादनांच्या खरेदीसाठी ही योजना आहे. गॅलेक्सी स्मार्टफोनच्या विविध मॉडेल्ससाठीही वर्षाच्या सुरवातीपासून अनेक ऑफर कंपनीने देऊ केल्या आहेत.

सॅमसंगची प्रतिस्पर्धी कंपनी अॅपलनेही इएमआय योजना यापूर्वी आणली होती. मात्र सॅमसंगच्या या योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद भारतीय ग्राहकांकडून मिळाला असून विक्रीत जवळजवळ दुप्पट वाढ नोंदविली गेली आहे. सॅमसंगचा भारतीय बाजारातील वाटा ४३ टक्के असून २०१२ मद्ये तब्बल १ कोटी गॅलॅक्सी फोन भारतात विकले गेले असल्याचे सायबर मिडीया रिसर्च कंपनीचे म्हणणे आहे.२०१२ मध्ये सॅमसंगने २ कोटी २१ लाख स्मार्टफोन भारतीय बाजारात आणले आहेत.