पाकिस्तानातील निवडणुकांबाबत अनिश्चितता

इस्लामाबाद दि.१५ – पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांना महिनाभरापेक्षाही कमी कालावधी राहिला असताना या निवडणुकांवर अनिश्चिततेचे सावट आल्याने या निवडणूका होतील काय अशी शंका निर्माण झाली आहे. प्रसार माध्यमातूनही या विषयावर सतत चर्चा सुरू असून या निवडणूका ठरलेल्या तारखांना होणे कठीण असल्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. ११ मे रोजी या निवडणुका होणार असल्याचे जाहीर झाले होते.

देशाची ढासळलेली सुरक्षा व्यवस्था. गेली दहा वर्षे तालिबान्यांचा होत असलेला हस्तक्षेप आणि दहशत, पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्तानचा चिघळत चाललेला प्रश्न यामुळे पुन्हा एकदा कांही तरी कारण काढून पाकिस्तानची सत्ता लष्करच ताब्यात घेईल असा अंदाज जाणकार वर्तवित आहेत. त्यासाठी कांहीतरी नाट्यमय हिंसाचाराच्या घटना घडविल्या जातील आणि निवडणूका बेमुदत लांबणीवर टाकल्या जातील असाही अंदाज तज्ञ वर्तवित आहेत.

बेनझीर भुट्टो याच्या २००८ साली झालेल्या हत्येनंतर निवडणूका थोड्या काळासाठी पुढे ढकलल्या गेल्या होत्या. सत्य परिस्थिती अशी आहे की बेनझीर यांच्या नंतर प्रभावशाली नेताच पाकिस्तानात उरलेला नाही. पाकिस्तानात लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारने प्रथमच आपला कार्यकाल पूर्ण केला असला तरी या पाच वर्षात सतत लष्कर सत्ता ताब्यात घेणार असल्याच्या अफवा उठत राहिल्या आहेत असे जाणकार सांगतात.

पाकिस्तानात नेांदणीकृत मतदारांची संख्या ८ कोटी ४० लाख इतकी असून सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यातील ४७.८ टक्के मतदार हे १८ ते ३५ या वयोगटातील तरूण मतदार आहेत. त्यांच्यावर क्रिकेटपटू आणि आता राजकारणी असलेल्या इम्रानखानचा प्रभाव पडू शकतो मात्र निवडणुकांच्या सर्वेक्षणानुसार निवडणूका झाल्याच तर नबाब शरीफ यांच्या पक्षाला सत्तेची संधी आहे.

Leave a Comment