कलकत्ता दि.१५ – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंबंधी केंद्र सरकारकडे असलेल्या गुप्त फायली उघड करून नेताजींच्या मृत्यूसंबंधीच्या चर्चेला पूर्णविराम द्यावा यासाठी नेताजींच्या कुटुंबियांनी गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत करण्याची विनंती पत्राद्वारे केली असल्याचे समजते. गेल्या आठवड्यात मोदी कलकत्ता भेटीवर होते तेव्हा नेताजींचे पणतू आणि कुटुंबाचा प्रवक्ता चंद्रा बोस यांनी मोदींची भेट घेऊन अशी मदत करण्यासाठी २४ कुटुंबिय सदस्यांच्या सह्या असलेले निवेदन मोदींना दिले आहे आणि मोदींनीही या बाबत सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे असे समजते.
या पत्रात चंद्रा बोस म्हणतात की नेताजी हे केवळ बंगालचे नव्हे तर सार्या देशाचे नेते होते. १९४५ साली विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले तरी तसे पुरावे मिळालेले नाहीत. या संबंधात केंद्र सरकारकडे अनेक गुप्त फायली आहेत. त्यातील माहिती सरकारने उघड केलेली नाही ती करावी आणि नेताजींच्या मृत्यचे गूढ संपवावे यासाठी गेली अनेक वर्षे नेताजींचे कुटुंबिय पाठपुरावा करत आहेत. मात्र केंद्राने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही.
केंद्र सरकारने या प्रकरणी न्यायाधीश मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमलेली होती. या समितीने नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झालेला नाही असा अहवाल दिला आहे मात्र केंद्राने तो फेटाळला आहे. पार्लमेंटसमोर हा अहवाल मांडला गेला मात्र कोणतेही कारण आणि चर्चा न करता तो फेटाळला गेला. नेताजींच्या कुटुंबियांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही असे पत्र दिले मात्र त्याची साधी पोचही दिली गेली नाही असे चंद्रा बोस यांचे म्हणणे आहे.
माहिती अधिकाराच्या हक्कानुसार केलेल्या अर्जातून पंतप्रधान कार्यालयाकडे नेताजींच्या संदर्भातल्या ३३ गुप्त फायली असल्याचे उघड झाले आहे मात्र या फायलींतील माहिती देण्यास असमर्थता दर्शविली गेली आहे. त्यामागे या फायलीतील माहिती उघड झाली तर देशाच्या परदेश संबंधांना तसेच देशाच्या सार्वभौमत्माला धोका पोहोचू शकतेा असे सांगितले गेले असल्याचे समजते.