‘थप्पड’ प्रकरण प्रसारमाध्यमांनी रंगवले-श्रीशांत

नवी दिल्ली – गुरुवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामन्यावेळी विराट कोहली व गौतम गंभीर यांच्यात झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांनी पाच वर्षांपूर्वी घडलेल्या श्रीशांत व हरभजनसिंग यांच्यातील ‘थप्पड’ प्रकरण पुन्हा उकरून काढले आहे. हरभजनने थप्पड नव्हे तर कोपर मारले होते, असा खुलासा त्यामुळे संतप्त झालेल्या श्रीशांतने ट्विटरवरुन केला आहे. ‘थप्पड’ प्रकरण प्रसारमाध्यमांनी रंगवलेल्याचेही त्याने म्हटले आहे.

आयपीएलच्या पहिल्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब व मुंबई इंडियन्समध्ये झालेला ‘तो’ सामना क्रिकेटप्रेमी अजूनही विसरले नसतील. पंजाबचा जलदगती गोलंदाज एस. श्रीशांत आणि मुंबईचा ऑफस्पिनर हरभजन यांच्यातील ‘थप्पड’ प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यावेळी श्रीशांत मैदानात बराच वेळ रडताना दिसला होता. मात्र, भज्जीने मला थप्पड नव्हे कोपर मारले होते, असा खुलासा एस. श्रीशांतने केला आहे. त्याचवेळी भज्जीची संभावना त्याने ‘पाठीत खंजीर खुपसणारा’ अशी केली होती.

श्रीशांतने आपल्या भावनांना पुन्हा एकदा वाट करुन दिली. त्याच्या म्हणण्यानुसार भज्जीने त्याला कोपर मारले होते आणि ते त्याला सहन झाले नाही. आम्ही सामना जिंकल्यानंतर मी हरभजनकडे हस्तांदोलन करण्यासाठी गेलो होतो; मात्र, सामना हरल्याने त्यावेळी तो रागात होता. त्या भरात त्याने काही तरी कृत्य केले. मात्र, या घटनेनंतर भज्जीला पश्चात्ताप झाला. जे काही झाले ते वाईटच होते. यामध्ये माझा कसलाच दोष नव्हता. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण नाहक रंगवले आहे’.

Leave a Comment