कोकाकोलाची ग्रामीण भारताला भुरळ

नवी दिल्ली दि.१३ – कोकाकोलाला आपल्या उत्पादनांसाठी ग्रामीण भारत हा नवा हॉटस्पॉट सापडला असून गेले काही महिने ग्रामीण भागात कोकाकोलाची लोकप्रियता अतिशय वेगाने वाढत चालली असल्याचे कंपनीला आढळून आले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना कंपनीचे वरीष्ठ उपाध्यक्ष वेंकटेश किणी म्हणाले की शहरी भागात कोकाकोलाचा खप आहेच. मात्र शहरे आता विकसित झाली आहेत त्यातुलनेने ग्रामीण भाग किवा छोटी गांवे असून विकसित होत आहेत. त्यामुळे या भागात कोकाकोलाचा खप शहरी भागापेक्षा अधिक वेगाने वाढतो आहे असे दिसून आले आहे. उन्हाळा नुकताच सुरू होत असल्याने उत्पादनांना येणारी मागणी लक्षात घेऊन कंपनीने आपले वितरण जाळे अधिक भक्कम करण्याकडे लक्ष पुरविले आहे.

देशात सध्या बावीस लाख विक्री केंद्रांवर कोक उत्पादने उपलब्ध आहेत ही विक्री केंद्रे २४ लाखांवर नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून किणी म्हणाले की ग्रामीण जनतेला नजरेसमोर ठेवून कंपनीने अनेक साईजही पॅकींग बाजारात आणली आहेत आणि त्याला ग्राहकांकडन चांगला प्रतिसाद मिळतो आहे. भारतात २०१२ मध्ये कंपनीने व्यवसायात १६ टक्के वाढ नोंदविली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.