कर्नाटक निवडणुकांत अण्णाद्रमुकचेही उमेदवार

चेन्नई, दि. १३ – चौरंगी लढतींमुळे यंदाच्या कर्नाटकमधील विधानसभा निवडणुका अत्यंत चुरशीने लढल्या जाणार आहेत. अशातच तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुकनेही कर्नाटकच्या निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.

कर्नाटकात 5 मे यादिवशी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी जयललिता यांनी आज अण्णाद्रमुकच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. तमिळनाडूत सत्तेवर असलेला अण्णाद्रमुक कर्नाटकातही आपले अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडत आहे. दरम्यान, कर्नाटकची सत्ता मिळवण्यासाठी प्रमुख चार राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच आहे. या चार पक्षांमध्ये राज्यातील सत्तारूढ भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा समावेश आहे.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक जनता पक्ष (कजप) हेही राज्याची सत्ता हस्तगत करण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत.

Leave a Comment