नवी दिल्ली, दि.१३ -भारत आणि मॉरिशस या देशांमध्ये आज निवडणूक व्यवस्थापन क्षेत्रातील सहकार्याबाबत महत्वपूर्ण करार करण्यात आला. भारतातील निवडणूक प्रक्रियेची भुरळ मॉरिशसवर पडली असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
भारतातील निवडणूक प्रक्रियेची मॉरिशसलाही भुरळ
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपथ आणि मॉरिशसचे निवडणूक आयुक्त मोहम्मद इरफान अब्दुल रहमान यांनी यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षर्या् केल्या. यावेळी दोन्ही देशांमधील वरिष्ठ निवडणूक अधिकारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेतील माहिती, अनुभव, कर्मचार्यांेचे प्रशिक्षण, सामग्री, तंत्रज्ञान, मतदारांमधील जनजागृती आदींच्या देवाणघेवाणीला चालना देण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे.
यावेळी मॉरिशसच्या निवडणूक आयुक्तांनी भारतातील निवडणूक प्रक्रियेचे कौतुक केले. जगातील सर्वांत मोठ्या निवडणुका शांततामय मार्गाने आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडत असल्याबद्दल त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या कामगिरीला विशेष दाद दिली. एवढेच नव्हे तर, भारतातील निवडणूक आचारसंहितेवरून मॉरिशसच्या आचारसंहितेने प्रेरणा घेतली असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने आतापर्यंत जगभरातील विविध निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी सतरा सामंजस्य करार केले आहेत. अशाप्रकारचे करार झालेल्यांमध्ये इजिप्त, व्हेनेझुएला, रिपब्लिक ऑफ कोरिया, संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम (युएनडीपी) आदींचा समावेश आहे.