इराणी संशोधकाने बनविले टाईम मशीन

तेहरान दि.१३ – इराणच्या सेंटर फॉर स्ट्रेटिजिक इन्हेन्शनचे व्यवस्थापकीय संचालक शास्त्रज्ञ अली राझेगी यांनी आर्यायेक टाईम ट्रॅव्हलिग मशीन तयार केल्याचा दावा केला आहे. हे मशीन भविष्याची सफर घडविणार नाही तर भविष्यकाळच तुमच्यापर्यंत आणेल असेही त्यांचे म्हणणे आहे. केवळ २७ वर्षांचे असलेले अली यांनी आत्तापर्यंत विविध प्रकारचे १७९ शोध लावले असून टाईम मशीनच्या प्रकल्पावर ते गेली दहा वर्षे मेहनत घेत होते असेही सांगण्यात येत आहे.

अली यांच्या म्हणण्याप्रमाणे युजरने या मशीनला स्पर्श केला की युजरची रिडींग कांही क्षणात नोंदवून हे मशीन त्याचा पुढील पाच ते दहा वर्षांचा भविष्यकाळ ९८ टक्के अचूक सांगू शकते. युजरला प्रिंट आऊटच्या स्वरूपात हा निकाल मिळू शकतो. वैयक्तीक संगणकाचाही वापर यासाठी करता येणे शक्य आहे असाही त्यांचा दावा आहे.

या मशीनचा वापर करून इराणी सरकार अन्य देशांशी त्यांचे लष्करी संबंध कसे असतील, परकीय चलनाच्या दरातील चढउतार तसेच तेलांच्या पुढील आठ ते दहा वर्षांतल्या किमती यांचे अचूक भविष्य मिळवू शकेल असा अली यांचा विश्वास आहे. पाच वर्षे अगोदरच असे अंदाज कोणत्याही सरकारला अचूक मिळू शकले तर ते सरकार त्यावरच्या उपाययोजना करू शकते तसेच आपली त्यासाठी तयारीही करू शकते असे सांगून अली म्हणाले की हे मशीन आमच्या धर्माविरोधात नाही. अमेरिका गेली कित्येक वर्षे अब्जावधी डॉलर्स असे मशीन बनविण्यासाठी खर्च करते आहे .हेच मशीन आम्ही अगदी कमी किमतीत बनविले आहे. अर्थात चीनी लोकांनी या मशीनची कॉपी करून तशीच मशीन बनवू नयेत म्हणून हे मशीन आत्ताच लाँच करण्याचा आमचा विचार नाही असेही अली यांनी स्पष्ट केले आहे.