पाटणा- ‘गुजरात हे राज्य पूर्वीपासूनच विकसित राज्य आहे. गुजरातच्या विकासात मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे कसलेच योगदान नाही. त्यामुळे त्यांनी विकासाच्या कितीही चर्चा केली. अथवा देश, विदेशांत कितीही भाषणे दिली तरी ते आगमी काळात पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. त्यांचे पंतप्रधानपदाचे स्वपन अपूर्णच राहणार,’ असे मत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी व्यक्त केले.
लालू म्हणाले, ‘ मोदींच्या कारकिर्दीत गुजरातचे मोठे नुकसान झाले आहे. गुजरातमध्ये उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर आहेत. इथे वरचेवर गुंतवणूक होत असते. मोदींचा या गुंतवणुकीशी कसलाही संबंध नाही. मोदी फुकटचे श्रेय लाटत आहेत. त्यांच्या कार्यकाळात गुजरातचे नुकसानच जास्त झाले आहे. त्यामुळे मोदी आगामी काळात कधीच पंतप्रधान होणार नाहीत. त्यांचे स्वपन अपूर्णच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘
गेल्या काही दिवसापासून नरेंद्र मोदी याना विरोध होत आहे. मोदींचे विरोधक त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्यानंतर लालू प्रसाद यादव यांनीही मोदींवर शरसंधान केले आहे.