गेलची वादळी खेळी, बंगळूरूचा दणदणीत विजय

ख्रिस गेलच्या नाबाद 85 धावांच्या खेळीच्या जोरावर आयपीएल-6च्या साखळी सामन्यात बंगळूरूने कोलकातावर आठ गडी राखून विजय मिळवला.

बंगळूरु- ख्रिस गेलच्या नाबाद 85 धावांच्या खेळीच्या जोरावर आयपीएल-6च्या साखळी सामन्यात बंगळूरूने कोलकातावर आठ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजीकरत कोलकाताने बंगळूरूपुढे विजयासाठी 155 धावांचे लक्ष्य ठेवले होते. बंगळूरुने केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात आणि 15 चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला.

त्याआधी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईड रायडर संघाने निर्धारित 20 षटकांत आठ बाद 154 धावा केल्या. कोलकाताकडून कर्णधार गौतम गंभीरने 59 धावांची खेळी केली.

विजयासाठी 155 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बंगळूरूची सुरुवात खराब झाली. मयांक अग्रवाल केवळ सहा धावांवर बाद झाला. त्यानंतर गेल आणि कर्णधार विराट कोहीली यांनी तिस-या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. विराट 35 धावा करुन बाद झाला. त्यानंतर गेलने एबी डिव्हीलीयर्ससह चौथ्या विकेटसाठी नाबाद 83 धावांची भागीदारीकरत संघाला सहज विजय मिळवून दिला. गेलने 50 चेंडूत नऊ षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने नाबाद 85 धावा केल्या.