जो रस्ता खेड्याकडून शहराकडे जातो. तोच रस्ता शहराकडून खेड्याकडे जातो. फक्त प्रत्येकाचा याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असल्याने कुणी खेड्यातून शहराकडे तर कुणी शहराकडून खेड्याकडे जावून विकास करित असतो. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता आणि शहरातील धकाधकीच्या तसेच महागाई, गुन्हेगारीने गाठलेला कळस, सरकारचे राज्यातील जनतेला वार्यावर सोडण्याचे धोरण यामुळे आता काही वर्षापूर्वी आपला, आपल्या कुटुबिंयाचा विकास करण्यासाठी शहरात आलेला माणूस या ठिकाणच्या परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर त्याच्या तोंडून आता अलगत एकच वाक्य निघताना ऐकू येत आहे, ते म्हणजे गड्या आपला गावचं बरा.
देशात दरवर्षी लाखो लोक पोटा-पाण्याच्या शोधासाठी गावाकडून शहराकडे, परप्रांताकडे धाव घेत असतात. एकिकडे आपले पितृगाव सोडताना मनात आपल्या माणसांचा विरह अतिव दु:ख देतो, तर दुसरीकडे संपन्नतेची इंद्रधनुषी स्वप्नेसुद्धा तरळत असतात. गेल्या दशकभरात उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, छतीसगड आणि राजस्थान आदी राज्यांमधून जवळजवळ पन्नास लाखाहून अधिक लोक महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब आणि दिल्ली आदी ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत.
जागतिक बँकेच्या एक रिपोर्टनुसार भारतातील लोकांचे खेड्यांतून शहरांकडे होणारे स्थलांतर ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. लोकांना गरिबीतून बाहेर काढून श्रीमंतीची वाट धरायला लावणारे हे शहरीकरण म्हणजे एक उत्तम पर्याय आहे. या रिपोर्टनुसार जगभरातील निम्मे उत्पादन त्याच्या पाच टक्क्याच्या कमी क्षेत्रावर होते. हे क्षेत्र अल्जेरियापेक्षाही छोटे आहे. जगातील सर्वात मोठ्या टोकियो या महानगरामध्ये जपानची एक चतुर्थांश लोकसंख्या म्हणजे जवळजवळ साडेतीन कोटी लोकसंख्या राहते. भारतातील मुंबईच्या एक चौरस किलोमीटर क्षेत्रात 30 हजार लोक राहतात. ही लोकसंख्या शांघायसारख्या शहरांपेक्षा दुप्पट आहे. 2006 मध्ये चीनमधील 6 कोटी जनता खेड्यांतून शहरात आली आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न झाली.
अमेरिकेत दरवर्षी सुमारे साडेतीन कोटी लोक आपली जागा बदलतात. तर दरवर्षी 80 लाख लोक एका राज्यातून दुसर्या राज्यात जातात. त्यामुळे तिथे स्थलांतर वृत्ती म्हणजे एक चांगले संकेत असल्याचे मानले जाते. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, भारतात 60 टक्क्यांपेक्षा अधिक लोक प्रमुख राज्यांमध्ये राहतात. स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन नावाच्या आणखी एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतातील शहरीकरणातील वेग जगाच्या तुलनेत अधिक आहे. या वाढत्या शहरीकरणांमुळे रोजगार, शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी यासारख्या मूलभूत सुविधांचा प्रश्न जटील होतो. याचाही विचार त्यात करण्यात आला आहे.
हे सर्व जरी खरे असले तरी सध्याच्या परिस्थितीचा विचार करता अशा प्रकारे स्थलांतरित झालेली कुटुंबे काही काळच अशा शहरामध्ये राहू शकतात. कारण त्याठिकाणचे वातावरण, संस्कृती, समाज, रिती-रिवाज आणि सर्वांना भेडसावणारी महागाई सारख्या नसतात. गेल्या वर्षी देशाची राजधानी दिल्लीत युवतीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या प्रकाराने संपूर्ण देश हादरून गेला. त्यानंतर देशभरात इतक्या काय बलात्काराच्या घटना घडल्या की, सगळा देश आणि देशातील नागरिकांना बलात्काराची जणू चटकच लागली आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. खेड्यांच्या तूलनेत शहरांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. कारण शहरात येणार्या प्रत्येक व्यक्तीला नवनवीन गोष्टींचे अनुकरण करण्यात अधिक रस असतो. नव घ्यावे, त्याचे आकलन करावे. परंतु, ते आपल्याच अंगलट येईल इतके नसावे, याची जाणीव तेव्हाच होते, जेव्हा अशा प्रकारच्या घटनांचे आपण बळी ठरतो. शहराच्या तुलनेत खेडे आजही सुरक्षित आहे.
समाजाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास शहरामधील भल्यामोठ्या सिमेंटच्या जंगलात कुठेतरी समाजाची अवस्था विखूरल्यासारखी झाली आहे. एकाच इमारतीमध्ये राहणार्या व्यक्ती एकमेकांना ओळखू शकत नाही. एखाद्यावर बिकट प्रसंग ओढावला तर समोरच्या फ्लॅटमध्ये किंवा खोली राहणारा माणूसही त्याला मदत करत नाही. तो आपण या समाजाचा भाग नाहीच आहे, अशा आर्विभावात वावरत असतो. परंतु, याबाबतील खेड्यातील परिस्थिती थोडी वेगळी आहे. आजही तेथे घरच्यांच्या सोबतच शेजार्यांचे संकट, दुःख आपले म्हणून त्यातून मार्ग काढणारी माणसे हयात आहेत.
याचा अर्थ शहरात राहूच नये असा होत नाही. परंतु, जे लोक खेड्यातून शहराकडे आपला विकास करण्यासाठी आली. ते या परिस्थितीत आपला तसेच आपल्या कुटुंबाचा विकास करण्याच्या नादात पुरते खचून जातात. या परिस्थितीत आणखी दबून जाऊ नये यासाठी ही मंडळी गड्या आपला गावच बरा असे म्हणताना दिसत आहेत