टोकियो, दि. 11 – उत्तर कोरियाने जर त्यांच्या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली, तर राजधानी टोकियोचे संरक्षण करण्यासाठी जपानने ‘पॅट्रियट’ क्षेपणास्त्रे सज्ज केली आहेत. अत्याधुनिक क्षमतेची जमिनीवरून हवेत मारा करणारी (पीएसी-3) ही दोन क्षेपणास्त्रे टोकियोमधील संरक्षण मंत्रालयाजवळ तैनात केली आहेत.
जपानच्या तीन कोटी जनतेचे संरक्षण करण्यासाठी सरकारने ही पावले उचलली आहेत, असे पंतप्रधान शिंझो अॅेबे यांनी सांगितले. उत्तर कोरियाच्या विरोधात संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रस्तावानुसार निर्बंधाची अंमलबजावणी करणे आहे.
जपानचे बेट असलेल्या ओकिनावा येथे पॅट्रियट-3′ क्षेपणास्त्राची बॅटरी बसवली आहे. आणिबाणीच्या काळात ही जागा प्रतिहल्ला करण्यासाठी चांगली आहे. आम्ही आता येथे कायमस्वरुपी क्षेपणास्त्र तैनात करू, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. उत्तर कोरियाच्या कोणत्याही क्षेपणास्त्रास पाडण्याचे आदेश जपानच्या संरक्षण दलांना दिले आहेत.
उत्तर कोरिया व दक्षिण कोरियाच्या सीमेवर असलेली दोन्ही देशांची सामाईक औद्योगिक वसाहत उत्तर कोरियाने बंद केली आहे. या वसाहतीतील सर्व कामे उत्तर कोरियाने थांबवली आहेत आणि त्यात काम करणार्या 53,000 कामगारांना परत बोलावले आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेविरोधात युद्धाची भाषा करून उत्तर कोरियाने या वसाहतीतील कामगारांचे रोजगार आणि रोखीने मिळणारे वेतन बंद करून टाकले आहे.